लेखक तानाजी धरणे लिखित ‘हेलपाटा’ ही कादंबरी मी आज दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केली. पहिल्यांदा वाचल्यानंतर तिच्यावर सविस्तर लिहिण्याची इच्छा होती; मात्र वेळेअभावी ते शक्य झाले नाही. दुसऱ्या वाचनानंतर मात्र या कादंबरीविषयी काही शब्द लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.
‘हेलपाटा’ ही केवळ कादंबरी नसून नव्या पिढीच्या मनात संघर्षाचे बळ निर्माण करणारी जीवनगाथा आहे. पूर्वीच्या काळात वडीलधाऱ्यांना जीवनातील चढ-उतार मुलांना वेगळे सांगण्याची गरज पडत नव्हती. त्या काळातील संस्कार, भावनिक नाती आणि समाजभान ही मूल्ये मुलांमध्ये आपोआप रुजत होती. शिक्षणाचा अभाव असला तरी जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत समृद्ध होती.
या कादंबरीत लेकरांच्या तोंडात दोन घास घालण्यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या आई-वडिलांचा संघर्ष आणि त्याचा बालमनावर होणारा परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. हा संघर्ष वाचताना वाचकाला अनेक ठिकाणी थांबून विचार करावा लागतो. ही कादंबरी सन २०२५-२६ मध्ये उस्मानिया विद्यापीठ, हैदराबादच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट झाली आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे पीएच.डी. संशोधनासाठी तिची निवड झाली आहे. याशिवाय २१ विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेली ही साहित्यकृती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळात लेखकाचा जन्म आणि त्यानंतर पोटासाठी सुरू झालेली संघर्षयात्रा मनाला अस्वस्थ करते. जन्मदात्री आई आणि अंगणातील गाईच्या स्वभाववैशिष्ट्यांची तुलना करताना लेखकाने केलेले वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. कादंबरीतील अनेक ग्रामीण शब्द मला थेट माझ्या बालपणात घेऊन गेले. खोंडरं, बाटूक, कुरुंदाचं जातं, चोतऱ्या, उकडा, ढिंबरं, मळणी, ईर्जिक, बिरागी, मदारी असे अनेक शब्द मी स्वतः अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाच्या आठवणी जाग्या करून गेले.
लेखकाने बालमनातील कुतूहल अनेक ठिकाणी अत्यंत गमतीशीर आणि निरागसपणे टिपले आहे. चुलीवर उकळणारा निर्शा दुधाचा चहा, शाळेच्या भीतीने पोटात येणारा गोळा, आजी सांगत असलेली स्वप्ननगरीच्या राजकुमाराची गोष्ट, मिरगाला लावलेले हळदीकुंकू, ग्रामीण विवाहसोहळ्यांतील साधेपणा आणि नात्यांतील जिव्हाळा हे सर्व प्रसंग वाचकाला आपल्या बालपणात घेऊन जातात. जागोजागी नियतीने दिलेले आघात आणि त्यातून आई-वडिलांची होत असलेली परवड लेखकाच्या मनावर खोल जखमा करून जाते. आजच्या प्रगत पण मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चाललेल्या पिढीला ही कादंबरी जणू डोळ्यात अंजन घालणारी ठरते. आज अनेक तरुण लहानसहान संकटांनी खचून जातात. काही नैराश्यात जातात, तर काही आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतात. अशा वेळी ‘हेलपाटा’ संघर्षाला सामोरे जाण्याचे धैर्य देते. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव करून देते. संकटे मोठी असली तरी त्यांच्यावर मात करता येते, हा विश्वास निर्माण करते.
आज शासनाला तरुणांच्या समुपदेशनासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभारावी लागत आहे, ही अभिमानाची नव्हे तर चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत ही कादंबरी प्रत्येक युवक-युवतीने वाचण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. ‘हेलपाटा’ नशिबाला दोष द्यायला शिकवत नाही; तर संकटांशी दोन हात करायला शिकवते. नियतीने कितीही कठीण प्रसंग उभे केले तरी खचून न जाता त्यांचा सामना करण्याची जिद्द या कादंबरीतून मिळते. लेखकाने स्वतःच्या आयुष्यातील विदारक वास्तव मांडताना कुठेही तक्रारीचा सूर लावलेला नाही. उलट प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचा संदेश दिला आहे. भाच्यासाठी स्वीकारलेले प्रौढत्व, आई-वडिलांप्रती असलेली कृतज्ञता आणि आजीने दिलेले संस्कार हे या कादंबरीचे भावनिक बळ आहे. अखेरीस संघर्षातून मिळालेले यश डोळ्यात आनंदाश्रू आणते. समाजाने दुर्लक्षित केलेल्या आयुष्याला नियती शेवटी सन्मानाचे वलय देते आणि वाचकाच्या मनात एक प्रश्न निर्माण करते—ही परतफेड भोगलेल्या दुःखांची भरपाई करू शकेल का?
आजच्या नव्या पिढीने ही कादंबरी आवर्जून वाचावी. कारण ती केवळ एका व्यक्तीची जीवनकहाणी नसून संघर्ष, जिद्द, संस्कार आणि जीवनमूल्यांचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. माझ्या ज्ञानसंग्रहात या कादंबरीने निश्चितच मौल्यवान भर घातली आहे. या कादंबरीचा हिंदी अनुवाद माया महाजन यांनी केला असून इंग्रजी अनुवाद प्रा. डॉ. पंकज शुक्ला (जबलपूर, मध्यप्रदेश) यांनी केला आहे. लवकरच ही कादंबरी गुजराती भाषेतही प्रकाशित होत आहे. माझ्या हाती आलेली ही सहावी आवृत्ती असून विवेक उगलमुगले यांची समर्पक प्रस्तावना आणि उत्तम कांबळे यांची पाठराखण या साहित्यकृतीला लाभली आहे. समाजाला प्रेरणा देणारी ही उत्कृष्ट साहित्यकृती निर्माण केल्याबद्दल लेखक तानाजी धरणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील साहित्यनिर्मितीस हार्दिक शुभेच्छा.
कादंबरी : हेलपाटा
लेखक : तानाजी धरणे
पृष्ठसंख्या : १३६
किंमत : ₹२५०/-
परीक्षण : सौ. कविता पाचंग्रे
मो. : ९२६०६४३१४३

