-देऊळगाव साखरशा, लोणी गवळीसह मेहकर तालुक्यातील ८ संस्थांचा समावेश; १६ ऑगस्टला मतदान
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ‘ब’ वर्गातील नऊ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा, लोणी गवळीसह आठ सहकारी संस्थांचा समावेश आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणेचे सचिव अशोक गाडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, ही माहिती मेहकरचे सहाय्यक निबंधक अविनाश सांगळे यांनी दिली.

दरम्यान, अनेक वर्षांनंतर या सहकारी संस्थांच्या निवडणुका होत असल्या तरी सध्या या संस्थांना कर्जवाटपासह काही महत्त्वाचे अधिकार नसल्याने निवडणुका अविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे. १६ जुलै रोजी अर्जांची छाननी होणार असून १७ जुलै रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ३ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून ४ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. १६ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

