श्रीराम मंदिर देणगीतील कथित अपहारप्रकरणी काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-लोणार तालुका व शहर काँग्रेसचे आंदोलन; देणगीचा पारदर्शक हिशेब जाहीर करण्याची मागणी

लोणार (वाजिद खान) : अयोध्या येथील श्रीराम मंदिर देणगीतील कथित अपहारप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश अवचार पाटील यांच्या सूचनेनुसार सोमवारी (दि. १३ जुलै) लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गजानन महाराज मंदिरात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह करण्यात आला.

लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रुजी फुके व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी नगराध्यक्ष भूषण पाटील, उपनगराध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे, बांधकाम सभापती अनिकेत मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आंदोलकांनी प्रभू श्रीराम यांच्या नावाने देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीचा संपूर्ण व पारदर्शक हिशेब जनतेसमोर जाहीर करण्याची मागणी केली. “राम आमच्या मनात आहेत, राम आमच्या संविधानात आहेत. प्रभू श्रीराम हे मर्यादा, न्याय, सत्य आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने जमा झालेल्या देणगीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे,” अशी भूमिका यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वाभिमानाच्या प्रेरणेने सत्याचा आग्रह महाराष्ट्रासह देशभर पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या सत्याग्रहात नगरसेवक पंढरी चाटे, श्याम राऊत, गुलाब सरदार, सभापती साहेबराव पवार, नगरसेवक जमील कुरेशी, माजी नगरसेवक शेख रऊफ, अंबादास इंगळे, सतीश राठोड, गोपी आखाडे, शहर उपाध्यक्ष गजानन मापारी, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, एजाज खान, विकास मोरे, भवानी मापारी, तानाजी मापारी, आप्पा शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रामभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

टाळ-मृदुंगाच्या गजरात आंदोलन

सत्याग्रहादरम्यान टाळ, मृदुंग आणि वीणेच्या गजरात भजन करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर लोणार पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांमार्फत संबंधित प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले.

Share This Article
Exit mobile version