भगवानगड (बाळासाहेब खेडकर) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायी पालखी सोहळ्याचे आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोमवारी (दि. १३ जुलै) पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने भगवानगड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबा यांनी नारायणगडावर असताना मराठवाड्यातून पहिल्या पायी पालखी सोहळ्याची परंपरा सुरू केली होती. भगवानगडाच्या स्थापनेपासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. सोमवारी दुपारी नेमक्या ३ वाजता पालखीचे प्रस्थान करण्यात आले. पालखीचे मुक्काम भारजवाडी, बावी, खोकरमोह, करंजवन, डिघोळ, जयवंतनगर, कुंबेफळ, आवार पिंपरी, कुर्डुवाडी आणि ढेकळेवाडी येथे होणार असून, अकराव्या मुक्कामाला पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या संपूर्ण प्रवासात विविध भागांतील अनेक दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. यामध्ये अंभोरे येथील भोसले महाराजांची दिंडी, गुंजमुर्ती संस्थान, शेषाबाई संस्थान (तांबवा), रामगड संस्थान, विठ्ठलगड संस्थान, रामेश्वर संस्थान, भगवानबाबा संस्थान (सुपेसावरगाव), भोगलवाडी संस्थान, राजा हरिश्चंद्र संस्थान, जवळा व बोरकिन्ही ग्रामस्थ, भाग्येश्वर संस्थान (तरडगव्हण), गणपतबाबा संस्थान (सावरगाव), कुमंडलेश्वर संस्थान (घोगस पारगाव), सिद्धेश्वर संस्थान (शिरूर कासार), मायंबा संस्थान (भालगाव), भगवानबाबा संस्थान (छत्रपती संभाजीनगर-पैठण-आळंदी), कानिफनाथ संस्थान (खडकवाडी), केशवराज संस्थान (वारणी), निरंजन संस्थान (एकनाथवाडी), सुदर्शनगड संस्थान (पाटणसांगवी), जय हनुमान संस्थान (राणेगाव), दुर्गाशक्तीगड (भिलवाडे), कानिफनाथ संस्थान (खर्डा), हनुमान टाकळी संस्थान, शहर टाकळी संस्थान, कानिफनाथ संस्थान (खोकरमोह), सालसिद्धेश्वर संस्थान (मिडसांगवी) आणि संत भगवानबाबा संस्थान (तागडगाव) यांचा समावेश आहे. ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या भव्य पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी गडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री, प्रधानाचार्य ह.भ.प. वेदांताचार्य नारायण महाराज शास्त्री, आमदार मोनिकाताई राजळे, प्रतापराव ढाकणे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यासह ह.भ.प. भगवान महाराज राजपूत शास्त्री, नवनाथ महाराज शास्त्री, अतुल महाराज शास्त्री, हनुमंत महाराज शास्त्री, संतोष महाराज शास्त्री, केशव महाराज शास्त्री, विवेक महाराज शास्त्री, गणेश महाराज शास्त्री, काशिनाथ महाराज शास्त्री आणि हजारो भाविक उपस्थित होते.
भाविकांकडून महाप्रसादाची पंगत
पालखी सोहळ्यासाठी आलेल्या हजारो भाविकांसाठी सखाराम दादा खेडकर, भगवान भिवसेन खेडकर, गोरक्ष पांडुरंग सानप (मालेवाडी), बाबुराव वामनराव ढाकणे, गंगाधर आश्रुबा ढाकणे (ढाकणवाडी), भानुदास सखाराम जाधव (खरवंडी), हनुमंत रघुनाथ खेडकर (दहिवंडी) आणि जालिंदर सूर्यभान सानप (माळेगाव) यांनी डाळ-भट्टी, लापशी, जिरा राईस, वरण, आमटी आणि भाकरीची महाप्रसाद पंगत आयोजित केली. तसेच गजानन माधवराव कांगणे (रानमळा, ता. मंठा, जि. जालना) यांच्या वतीने दिवसभर मोफत चहाचे वाटप करण्यात आले.
घोगस पारगावच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष
पालखी प्रस्थानावेळी घोगस पारगावच्या लेझीम पथकाने आकर्षक डाव सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली. त्यांच्या तालबद्ध सादरीकरणाला भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
साईगुलाब व दोस्ती बँडवर घुमला संत भगवानबाबांचा जयघोष
पालखी सोहळ्यादरम्यान साईगुलाब व दोस्ती बँडने संत भगवानबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित भक्तिगीतांचे सादरीकरण केले. या भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून, “संत भगवानबाबांचा विजय असो”च्या जयघोषाने भगवानगड दुमदुमून गेला.