-मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तहसीलदारांचे आवाहन
चिखली (अंकुश पाटील) : राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त चिखली तहसील कार्यालयामार्फत दि. २१ जुलै २०२६ रोजी ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा उद्देश आहे. हे शिबिर चिखली मंडळातील मौनी बाबा संस्थान, चिखली येथे आयोजित करण्यात आले आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अंतर्गत नागरिक व शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र वाटप, गावठाण स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजना, प्रशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, ‘जिवंत सातबारा’ मोहीम, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनांतील लाभ, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, पीएम-किसान योजनेअंतर्गत लँड सीडिंग, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व फेरफार उतारे, AgriStack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID), नवीन आधार नोंदणी व अद्ययावतीकरण, विविध महसुली दाखले, मतदान ओळखपत्र वितरण व आधार जोडणी, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड सेवा, ई-केवायसी, जॉब कार्ड, आभा कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आरोग्य तपासणी व लसीकरण, महाडीबीटी पोर्टलवरील वैयक्तिक लाभाच्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामविकास विभागाच्या योजना तसेच जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी सेवांचा समावेश आहे.
तसेच फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, कोल्ड स्टोरेज, शेडनेट, पॉलीहाऊस, सिंचन साधने, शेततळे यांसारख्या कृषी योजनांबाबतही लाभार्थींना मार्गदर्शन व लाभ दिला जाणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.
स्थळ : मौनी बाबा संस्थान, चिखली
दिनांक : २१ जुलै २०२६

