आळंदी मंदिरात संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा भक्तिभावात संपन्न

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-ज्ञानेश्वर महाराज जाधव यांचे सुश्राव्य कीर्तन; संत परंपरेचे जतन करण्याचे वारकरी सेवा संघाचे आवाहन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : सर्व संतांचे समाधी सोहळे आणि पुण्यतिथी समाजाने एकत्रितपणे साजरे करावेत, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा हरिनाम गजरात अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यानिमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जाधव यांची हृदयस्पर्शी कीर्तनसेवा झाली. आपल्या निरूपणात त्यांनी संतांच्या अवतारकार्याचा गौरव करत मुक्ताबाईंनी चांगदेवांना दिलेले ज्ञान, विभीषणाची भक्ती तसेच संत नामदेवरायांच्या कीर्तनात प्रत्यक्ष भगवंतही तल्लीन होऊन नृत्य करत असल्याचे वर्णन करणारे अनेक दाखले दिले. ब्रह्मगिरीच्या कुशीत असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाचे आध्यात्मिक महत्त्वही त्यांनी अभ्यासपूर्ण शब्दांत उलगडून सांगितले.

१४ वर्षांची अखंड परंपरा

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, वारकरी सेवा संघ (पुणे) आणि श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था (आळंदी देवाची) यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १४ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. ह.भ.प. राजाभाऊ चोपदार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी अल्प प्रतिसादात सुरू झालेल्या या चळवळीला आज भव्य स्वरूप प्राप्त झाले असून, अनेक नामवंत कीर्तनकार या सोहळ्यात सेवा देण्यासाठी उत्सुक असतात. या उपक्रमाच्या यशाचे श्रेय राजाभाऊ चोपदार यांना दिले जाते.

गायक-वादकांची मनोभावे सेवा

श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गायक, वादक आणि टाळकरी म्हणून मनोभावे सेवा बजावली. ह.भ.प. मोहन महाराज शिंदे, रवींद्र महाराज कुमकर, साहिल उत्तेकर, राज गोरे आणि पवन लिंगायत यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. कीर्तनानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी वारकरी सेवा संघाच्या वतीने आवाहन करण्यात आले की, ज्या पद्धतीने आळंदीत सर्व संतांचे समाधी सोहळे आणि पुण्यतिथी एकत्रितपणे साजरे केले जातात, त्याचप्रमाणे राज्यातील इतर संतांच्या देवस्थानांनीही ही परंपरा जोपासून संतविचारांचा प्रसार करावा.

Share This Article
Exit mobile version