आळंदी मंदिरात एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी; आकर्षक पुष्पसजावटीने वेधले लक्ष

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-इंद्रायणी घाटावर हरिनाम गजरात इंद्रायणी आरती; नदी स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपली

आळंदी (अर्जुन मेदनकर) : वारकरी संप्रदायातील प्रथा-परंपरांचे पालन करत भागवत एकादशीनिमित्त आळंदी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात एकादशी साजरी करण्यात आली. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा मंदिरातील भाविकांची गर्दी नेहमीपेक्षा काहीशी कमी असली, तरी दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. इंद्रायणी नदी घाटावर स्नान, पूजन आणि हरिनाम गजरात इंद्रायणी आरती उत्साहात पार पडली.

माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. श्रींच्या वैभवी रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. देवस्थानच्या वतीने सोशल मीडियाद्वारे थेट दर्शनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. एकादशीनिमित्त मंदिरात प्रवचन सेवा, श्रींची पूजा, आरती आणि फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी इंद्रायणी नदीत स्नान करून तीर्थक्षेत्राचे माहात्म्य जोपासत महाद्वारातून श्रींचे मुखदर्शन घेत नगरप्रदक्षिणा केली. इंद्रायणी घाटावर देवस्थान आणि इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने हरिनाम गजरात इंद्रायणी आरती पार पडली. समितीच्या संयोजिका अनिता झुजम, सुवर्णाताई काळे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नदीपूजन करण्यात आले. त्यानंतर इंद्रायणी आरती आणि पसायदान सादर करण्यात आले. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आळंदी-दिघी वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले होते. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत वाहतुकीतील अडथळे दूर करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आळंदी व दिघी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, वाहतूक पोलीस तसेच देवस्थानचे सेवक कार्यरत होते.

इंद्रायणी आरतीतून स्वच्छतेचा संदेश

राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, इंद्रायणी आरती सेवा समिती, महिला बचत गट, महिला मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी घाटावर स्वच्छता मोहीम राबवून नदीची आरती करण्यात आली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, गोविंद ठाकूर, माऊली घुंडरे पाटील, लता वर्तले, नीलम कुरधोंडकर, सरस्वती भागवत, शोभा कुलकर्णी, तारामती गोरे, पुष्पा लेंडघर, काशीबाई अडगणे, जयश्री भागवत, सावित्री घुंडरे पाटील, राणी वाघ, अनिता शिंदे, उषाताई पाटील, सुरेखा काळभोर, कौशल्य देवरे, विमल मुसळे, सुवर्णाताई काळे, सुरेखा कुऱ्हाडे पाटील, इंदुबाई गावडे, आदिती शिंदे, काका मोरे आदी उपस्थित होते. आळंदी देवस्थानच्या वतीने विश्वस्त रोहिणी पवार, माजी नगरसेविका मालन घुंडरे, संजय घुंडरे पाटील, श्रींचे पुजारी व देवस्थानचे सेवक यांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या घोषात आरती करण्यात आली. यावेळी इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने संयोजक अनिता झुजम व आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले. दरम्यान, इंद्रायणी घाटावर समितीच्या वतीने उभारण्यात आलेला ३१ फूट उंच भगवा ध्वज अलीकडील महापुरात बाधित होऊन तुटल्याने नव्याने ध्वज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भात पंचनामा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Share This Article
Exit mobile version