कपास क्रांती व बाजरी पीक प्रात्यक्षिकांची तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-मंगरूळ खुर्द येथे शेतभेट; आधुनिक पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, ३१ जुलैपूर्वी पीकविमा भरण्याचे आवाहन

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) :  महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कपास क्रांती प्रकल्प आणि बाजरी प्रकल्प अंतर्गत मंगरूळ खुर्द येथे उभारण्यात आलेल्या पीक प्रात्यक्षिकांची तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांनी प्रत्यक्ष शेतभेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पिकांच्या वाढीचा आढावा घेत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

शेतभेटीदरम्यान श्री. जोगदंड यांनी कपाशी व बाजरी पिकांच्या वाढीची स्थिती, पीक व्यवस्थापन, शिफारशीनुसार करण्यात आलेल्या कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच प्रात्यक्षिकांची परिणामकारकता याची सविस्तर पाहणी केली. विविध प्रात्यक्षिकांमधील पिकांची गुणवत्ता, वाढीचा वेग आणि शेतकऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी संबंधितांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत संतुलित खत व्यवस्थापन, योग्य वेळी आंतरमशागत, तण नियंत्रण, कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन पिकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. अधिक उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण पीक घेण्यासाठी कृषी विभागाच्या शिफारशींचे पालन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

या पाहणी दौऱ्यात सहाय्यक कृषी अधिकारी रवी ढाकणे, सहाय्यक कृषी अधिकारी संतोष भागवत तसेच शेतकरी संजय काकडे उपस्थित होते. त्यांनीही शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, अनुदान आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देत शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. या भेटीमुळे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले असून, कपास क्रांती व बाजरी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांमुळे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन उत्पादनवाढीस चालना मिळणार असल्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.

पीकविमा योजनेचा ३१ जुलैपूर्वी लाभ घ्या

शेतकऱ्यांनी कमी-अधिक पावसाच्या परिस्थितीत पेरणी केलेल्या खरीप हंगामातील कापूस, तूर आदी पिकांचा पीकविमा ३१ जुलैपूर्वी उतरवून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version