-स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; दोन लाखांहून अधिक किमतीचा विदेशी दारूसाठा व दुचाकी जप्त
वर्धा (प्रकाश कथले) : स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दयाल नगर परिसरात धडक कारवाई करत अवैधरित्या विदेशी दारूचा साठा करून विक्री करणाऱ्या नरेश उर्फ ‘टिक्का’ डोडाणी (रा. दयाल नगर) याला अटक केली. या कारवाईत विदेशी दारू, बिअर आणि एक इलेक्ट्रिक चेतक मोपेड असा एकूण २ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेला नरेश उर्फ टिक्का डोडाणी हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या विदेशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दयाल नगर येथील त्याच्या निवासस्थानी धाड टाकली. घरासमोर उभ्या असलेल्या एमएच-३२-एडब्ल्यू-२३०७ क्रमांकाच्या इलेक्ट्रिक चेतक मोपेडच्या डिकीत तसेच घरझडतीदरम्यान विदेशी दारू व बिअरचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने हा दारूसाठा नालवाडी येथील दिनेश यंडाळे याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार नरेश उर्फ टिक्का डोडाणी आणि दिनेश यंडाळे या दोघांविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार सचिन इंगोले, विक्रम काळमेघ, अरविंद इंगोले, राहुल अधवाल व त्यांच्या पथकाने केली.

