रायपूरच्या मतदार यादीत ‘अफगाणिस्तान’, ‘बिस्तर पर जाना’, ‘पुराना’, ‘साकी’, ‘अंतरवासना’ अशी संशयास्पद नावे!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-मतदार यादीची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे; लोकशाही वाचविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे – आ. श्वेता महाले पाटील

चिखली (महेंद्र हिवाळे) : चिखली विधानसभा मतदारसंघातील रायपूर गावाच्या मतदार यादीत काही अत्यंत संशयास्पद आणि विचित्र स्वरूपाच्या नोंदी आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मतदार यादीत “मोहम्मद अफगाणिस्तान”, “बिस्तर पर जाना”, “पुराना”, “तेलगू विकास खिलाडी”, “प्रोडक्ट का जानकारी”, “साकी” आणि “अंतरवासना” अशा नावांच्या नोंदी दिसून आल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या नावांच्या व्यक्ती गावात वास्तव्यास असल्याची माहिती कोणालाही नाही. त्यामुळे या नोंदींची तातडीने सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी केली आहे.

आ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, मतदार यादी हा भारतीय लोकशाहीचा पाया असून त्यामधील प्रत्येक नाव सत्य, अचूक आणि पात्र नागरिकाचे असणे अत्यावश्यक आहे. मतदार यादीत चुकीच्या, बनावट किंवा संशयास्पद नोंदी राहिल्यास लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रत्येक प्रकरणाची निवडणूक आयोगाने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, मतदार यादीतील अशा नोंदी आढळल्यानंतर केवळ चर्चा करून थांबणे पुरेसे नाही. प्रत्येक नागरिकाने आपल्या गावातील मतदार यादी काळजीपूर्वक तपासावी. एखादी नोंद संशयास्पद वाटल्यास आवश्यक पुराव्यांसह निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा निवडणूक आयोगाकडे हरकत नोंदवावी. योग्य पडताळणीनंतरच अशा नोंदींबाबत अंतिम निर्णय घेतला जावा. आ. महाले यांनी स्पष्ट केले की, भारतीय लोकशाहीमध्ये मताधिकार हा केवळ पात्र भारतीय नागरिकांचाच अधिकार आहे. त्यामुळे मतदार यादीतील प्रत्येक नावाची शहानिशा होणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या किंवा बनावट नोंदींना स्थान राहू नये, यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे. रायपूर गावातील या प्रकरणाची संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. तसेच आवश्यक असल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार श्वेता महाले पाटील यांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version