-मेरा खुर्द परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; पिकांचे संरक्षण व नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी
चिखली (अंकुश पाटील) : चिखली तालुक्यातील मेरा खुर्द परिसरात वन्य प्राणी, विशेषतः रोह्यांच्या कळपांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पेरणीनंतर उगवलेल्या पिकांची सातत्याने नासाडी होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आधीच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यात सोयाबीन, उडीद, मूग, कापूस आदी पिकांसाठी महागडी बियाणे, खते व औषधे खरेदी करून मोठा खर्च करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीची मशागत व पेरणी केली आहे. आता पिके उगवून वाढीच्या अवस्थेत असताना रोह्यांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी दिवसभर शेतात राबत असले तरी रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढत आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. वन विभागाने तातडीने रोह्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करावे. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मेरा खुर्द येथील शेतकरी रामदास मुजुमले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट :
“आम्ही कर्ज काढून शेतीसाठी पेरणी केली आहे. कधी निसर्ग तर कधी वन्य प्राणी आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहेत. शेकडो रोह्यांचे कळप शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. वन विभागाने तातडीने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.”
– रामदास मुजुमले
शेतकरी, मेरा खुर्द

