बोगस सोयाबीन बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा; शिवसेनेचा चिखली कृषी विभागाला घेराव

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान; परवाने रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

चिखली (अंकुश पाटील) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात बोगस व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने चिखली तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाला घेराव घातला. बोगस बियाणे विकणाऱ्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख श्रीराम झोरे, शहर संघटक प्रीतम गैची, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही कृषी सेवा केंद्रांमार्फत नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट व निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे विकले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ते संकटात सापडले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने धडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली.

निवेदनात बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची सखोल चौकशी करून त्यांच्याकडील साठा जप्त करावा, संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व कृषी सेवा केंद्र चालकांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी दिला. बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या आंदोलनात अशोक राजपूत, लालसिंग मोरे, सखाराम पाटील, राहुल मिसाळ, हरी इंगळे, छगन वानखेडे, निवृत्ती घुबे, शुभम वानखेडे, समाधान जाधव, रवी पेठकर, पूंजाजी शेळके, अनिल जावरे, सोहेल शहा, नारायण वाणी, अशोकराव मोहिते, दिनकर मोरे, गजानन डुकरे, लक्ष्मण इंगळे, राजू इंगळे, अंकुश इंगळे, संजय कदम, प्रदीप सपकाळ यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share This Article
Exit mobile version