-दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने, तर एकाचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा परिसरातील शिंदी येथे अवघ्या २४ तासांच्या कालावधीत तिघांचे निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने, तर एकाचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. तिघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुलाबराव माधवराव खरात (वय ७८) यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना ९ जुलै रोजी रात्री ८ वाजता त्यांचे निधन झाले. ही घटना ताजी असतानाच शिंदी येथील ताराबाई भिकनसिंग राजपूत (वय ७९) यांचे ९ जुलै रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
या दोन घटनांनंतर आज, १० जुलै रोजी शिंदी येथील सधन शेतकरी भुजंगराव बाजीराव खरात (वय ७०) यांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते शुक्रवारी आठवडी बाजारासाठी चिखलीहून साखरखेर्ड्याकडे एसटी बसने येत होते. प्रवासादरम्यान त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. बसचे चालक व वाहक यांनी प्रवाशांच्या मदतीने त्यांना तातडीने साखरखेर्डा येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल मगर यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भुजंगराव खरात यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. गुलाबराव खरात यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. तर ताराबाई राजपूत यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. अवघ्या एका दिवसात गावातील तीन ज्येष्ठ व्यक्तींच्या निधनामुळे संपूर्ण शिंदी गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

