-महाप्रवेशद्वाराच्या उभारणीचा इतिहास उलगडणाऱ्या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन; देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांचे प्रतिपादन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : देहू येथील ‘ज्ञान-कर्म-भक्तियोग’ महाप्रवेशद्वार ही केवळ एक वास्तू नसून भक्ती, ज्ञान आणि संतपरंपरेचे जिवंत प्रतीक आहे. विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी श्रीक्षेत्र आळंदी-देहू विकास समितीच्या माध्यमातून उभारलेल्या या महाप्रवेशद्वाराने जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज व देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांनी केले.
ह.भ.प. बापूसाहेब मोरे म्हणाले, “२५ वर्षांपूर्वी जगद्गुरू तुकोबारायांच्या नावाला साजेसे भव्य महाप्रवेशद्वार उभे राहिले. या प्रवेशद्वारामुळे देहूच्या वैभवात मोठी भर पडली. आज या संपूर्ण प्रवासाचा इतिहास पुस्तिकेच्या माध्यमातून समाजासमोर येत असून, ही पुस्तिका भावी पिढीला संत विचारांची आणि तीर्थक्षेत्राच्या विकासाची प्रेरणा देणारी ठरेल.” क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीने गेल्या अनेक वर्षांत देहूच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा इतिहास या पुस्तिकेतून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. प्रा. स्वाती कराड-चाटे म्हणाल्या, “विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या महाप्रवेशद्वाराला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वास्तूच्या उभारणीमागील इतिहास, परिश्रम आणि समितीच्या कार्याचा ठसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे संतसेवा आणि विश्वशांतीचे कार्य भविष्यातही अविरत सुरू ठेवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब काळोखे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले, तर आभार उमेश टीजगे यांनी मानले.

