आळंदीतून आजोळघरी माऊलींच्या पालखी सोहळ्याला भावपूर्ण निरोप

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-गांधीवाड्यात हरिजागर; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी, पुण्याकडे हरिनाम गजरात प्रस्थान

आळंदी (अर्जुन मेदनकर) : लाखो वैष्णव भक्तांच्या मांदियाळीत भगव्या पताका उंचावत आळंदीहून उद्योगनगरीमार्गे पुण्यनगरीकडे माऊलींचा पालखी सोहळा गुरुवारी पहाटे हरिनामाच्या गजरात मार्गस्थ झाला. अलंकापुरीतील जुना श्रीपादबुवा गांधीवाडा (रामवाडा) येथील नव्याने विकसित दर्शनबारी मंडपात आजोळघरी झालेल्या पहिल्या मुक्कामानंतर श्रीक्षेत्रोपाध्ये, श्रींचे पुजारी, माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी व गांधी परिवारासह आळंदीकरांचा पाहुणचार स्वीकारून माऊलींच्या वैभवी पालखी सोहळ्याने पुण्याकडे प्रस्थान केले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यात दोन दिवस मुक्काम करून शनिवारी (दि. ११) दिवेघाटमार्गे सासवडकडे रवाना होणार आहे.

आळंदीतील एक दिवसाचा मुक्काम संपल्यानंतर माऊलींना निरोप देण्यासाठी आळंदीकर धाकट्या पादुका आणि थोरल्या पादुका मंदिरापर्यंत लहानग्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे बत्तीस दिवसांचा विरह सहन करावा लागणार असल्याने अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. माऊली मंदिरातील तसेच मुक्कामाचे नियोजन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, निलेश महाराज लोंढे, रोहिणी पवार, योगी निरंजननाथ, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक तसेच सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी केले. पोलीस, महसूल प्रशासन आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था सुरळीत पार पडली. गेल्या चार दिवसांपासून आळंदीत अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. गुरुवारी पहाटे भाविकांना आजोळघरातील माऊलींच्या पादुकांचे पालखीसह रथातून दर्शन घेता आले. गांधी कुटुंबीयांच्या वतीने रुद्राभिषेक, पादुका पूजन व नैवेद्य अर्पण करण्यात आला. देवस्थानच्या वतीने पहाटपूजा व आरती झाली. त्यानंतर उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वतीने परंपरेनुसार नैवेद्य अर्पण करण्यात आला. पहाटेपासूनच आळंदीकर ग्रामस्थ पालखी खांद्यावर घेण्यासाठी सज्ज झाले होते. आजोळघरातून श्रींची पालखी ग्रामस्थ व खांदेकऱ्यांनी खांद्यावर उचलून वैभवी चांदीच्या रथात विराजमान केली. “माऊली-माऊली” आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”च्या जयघोषात पालखी नगरपालिका चौकातून नवीन पुलामार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाली. यापूर्वी स्वर्गीय माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांच्या स्मरणार्थ सुदीप गरुड व गरुड परिवाराच्या वतीने रथाची आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने देवस्थान समिती, पालखी सोहळ्याचे मालक, चोपदार आणि दिंडीतील मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, नगरपरिषदेचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आळंदीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके व पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात आली. प्रदक्षिणा मार्ग, पालिका चौक, देहू फाटा, चोविसावाडी आणि वडमुखवाडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी माऊलींच्या पालखी रथाचे व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील महिला, पुरुष आणि लहान मुले माऊलींच्या रथासोबत हरिनाम गजरात सहभागी झाले. विविध मंडळे व संघटनांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा, पोहे, गूळदाणी, पिण्याचे पाणी आदींची सेवा देण्यात आली. इंद्रायणी नदीवरील पुलाचे कठडे महापुरात तुटल्याने तेथे दुरुस्तीचे काम सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भाविकांना प्रसाद व आरोग्य सेवा

माऊलींच्या वैभवी पालखी सोहळ्याला भावपूर्ण निरोप देताना आळंदी येथील समाजरत्न नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला व जय भगवान प्रतिष्ठान यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वितरण तसेच विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Share This Article
Exit mobile version