-आळंदीतून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे नामजयघोषात प्रस्थान
-हजारो वारकऱ्यांची उपस्थिती; श्रींच्या चलपादुका पालखीची मंदिर प्रदक्षिणा
पाहुणचारास सोहळा गांधी वाड्यात विसावला
आळंदी (अर्जुन मेदनकर) : वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली गळ्यात तुळशीमाळ, हातात भगव्या पताका आणि मुखाने हरिनामाचा गजर करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत, पोलीस बंदोबस्तात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान भक्तिमार्गाचे दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंग यांच्या दर्शनासाठी व वारीला जाण्यास माऊली मंदिरातील वीणा मंडपातून बुधवारी (दि. ८) हरिनाम गजरात सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास झाले.
अलंकापुरीत प्रदीर्घ वेळेनंतर श्रींचे अश्व आळंदीत प्रवेशले; परंपरांचे अखेर पालन
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण; गर्दीवर प्रभावी उपाय
आळंदी देवस्थानने प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केल्याने लाखो भाविक व नागरिकांना सोहळा आपापल्या घरातून सुरक्षितपणे पाहता आला. आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेण्याची पर्वणी यामुळे नागरिक व भाविकांना लाभली. मात्र दिंडीकरी आणि खांदेकऱ्यांच्या मंदिर प्रवेशाच्या संख्येवर नियंत्रण आणल्याने ग्रामस्थ आणि दिंडीतील वारकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. मंदिरात प्रवेशाच्या कारणावरून पोलीस आणि वारकरी यांच्यात किरकोळ वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. काही वारकऱ्यांनी सुरक्षा कठडे ओलांडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे किरकोळ वादंग निर्माण झाले. माऊली मंदिर परिसरातील रस्ते पोलीस प्रशासनाने भाविकांसाठी बंद ठेवल्याने भाविकांना थेट कळसदर्शन व मंदिर प्रदक्षिणा करता आली नाही. भागीरथी नाला मार्गावर अस्वच्छता, राडारोडा तसेच अपुरी स्वच्छता यामुळे भाविकांची गैरसोय झाली. नाल्यातून वाहण्याऐवजी पाणी नाल्यावरून वाहत असल्याने गैरसोय अधिक वाढली. मंदिर परिसरातील रामघाट, दगडी दोन घाट, शनी मारुती मंदिर मार्ग व भागीरथी नाला मार्गावरील वापरावर मर्यादा आल्याने भाविक इतर मार्गांनी आले; मात्र तेथूनही पुढे जाण्यास निर्बंध असल्याने नाराजी वाढली. प्रस्थानदिनी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रस्थान सोहळ्याचे नियोजन यावर्षी थेट वरिष्ठांच्या हस्तक्षेपात झाले. गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रहदारीची गैरसोय झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाच्या नियोजनातून आळंदी देवस्थान, सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रस्थान पार पडले. प्रशासनाला आळंदीकर नागरिक व भाविकांनीही मोठा प्रतिसाद दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला. वाहतूक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी प्रभावी नियोजन केले. मात्र काही वारकरी आणि स्वयंसेवकांना सेवेच्या काळात पोलीस प्रशासनाकडून गैरसोयीची वागणूक मिळाल्याने सेवकांमध्ये नाराजी राहिल्याचे नागरिकांनी सांगितले.
अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दुपारपर्यंत दर्शनाची सोय करण्यात आली होती. श्रींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, सकाळी नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेनुसार कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिरात सेवेकरी व स्वकाम सेवकांनी स्वच्छता स्वयंसेवकांच्या माध्यमातून सेवा बजावली. मंदिर प्राकार व श्रींचा गाभारा प्रस्थानपूर्व स्वच्छ करण्यात आला. सेवाभावी वृत्तीने सेवकांनी आपली सेवा बजावली. पालखी पायी वारी सोहळा असल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रम हरिनाम गजरात पार पडले. सोहळ्यास यावर्षी परंपरेनुसार दुपारी सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे प्रस्थानदिनी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास श्रींच्या रथापुढील व रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांतील मर्यादित भाविकांना मंदिरातील देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरेप्रमाणे चोपदारांच्या सूचनेनुसार प्रवेश देण्यात आला. यावर्षी दिंड्या व संबंधित दिंडी प्रमुख, वारकरी घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांनाही मर्यादित स्वरूपात प्रवेश देण्यात आला.
दरम्यान, श्रींच्या मंदिरात माऊलींच्या समाधीवर ११ ब्रह्मवृंदांच्या वतीने श्रींना वैभवी पोशाख झाल्यानंतर श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने माऊलींच्या समाधीची परंपरेनुसार हरिनाम गज
रात आरती झाली. त्यानंतर आळंदी देवस्थानतर्फे श्रींची आरती करण्यात आली. दरम्यान, श्रींच्या वैभवी चांदीच्या पादुका पालखी प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या पालखी चौथऱ्यावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. श्रींच्या चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना संस्थानतर्फे वेदमंत्रांच्या जयघोषात करण्यात आली. यावेळी सोहळ्यातील नियमानुसार आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप करण्यात आले. श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडी प्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर व बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते नारळ प्रसाद देण्यात आला. श्रींच्या संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. परंपरेतील धार्मिक उपक्रम पूर्ण होताच श्रींच्या चलपादुका देवस्थानतर्फे पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र व बाळासाहेब आरफळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
मालक आरफळकर यांच्या नियंत्रणाखाली श्रींच्या पादुकांची पालखीतून हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाली. श्रींच्या वैभवी चलपादुकांची पालखीत विधिवत पूजा करण्यात आली. श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थांनी “माऊली… माऊली…” असा नामजयघोष करीत खांद्यावर उचलून वीणा मंडपातून पंढरीकडे हरिनाम गजरात प्रस्थान केले. यावर्षी ठराविक मान्यवरांना दिंडीतून प्रवेश देण्यात आला.
पायी वारी असल्याने मर्यादित स्वरूपात भाविकांची उपस्थिती राहिली. आळंदी देवस्थानने श्रींच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केल्याने लाखो नागरिकांना घरी राहून सोहळा पाहता आला. यावर्षी श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा व ग्रामप्रदक्षिणा हरिनाम जयघोषात झाली. आळंदी मंदिरातील लक्षवेधी पुष्पसजावट विशेष आकर्षण ठरली. नदीघाटावर देहू-आळंदी विकास समितीच्या वतीने यावर्षी कोणतेही लोकशिक्षणपर कार्यक्रम झाले नाहीत. थेट प्रक्षेपणामुळे नागरिकांनी घरबसल्या पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. आळंदी मंदिरातील पुष्पसजावटीला भाविकांनी भरभरून दाद दिली. यावर्षी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग चऱ्होली खुर्द मार्गे पुण्याकडे बदलण्यात आला असल्याचे आळंदी देवस्थानने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना कळवून चऱ्होली खुर्द रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची मागणी केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम आळंदी येथील गांधी वाड्यातील दर्शनबारी येथे होऊन गुरुवारी (दि. ९) सकाळी पुण्यनगरीकडे हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे.
आळंदीत प्रस्थान सोहळ्यास येता न आल्याची भाविकांची खंत
प्रस्थानदिनी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहता न आल्याने अनेक भाविकांनी खंत व्यक्त केली. मात्र पुण्यापासून पुढे सोहळ्यात सहभागी होऊन आनंदवारीचा अनुभव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पब्लिक ॲड्रेस सिस्टीम प्रभावी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याअंतर्गत पायी वारीच्या पूर्वनियोजनासाठी तसेच भाविक व नागरिकांना सेवा-सुविधांची माहिती देण्यासाठी सोहळ्यात आळंदी पोलीस विभागाच्या वतीने पब्लिक ॲड्रेस सिस्टीम प्रभावीपणे राबविण्यात आली. भाविक, नागरिक तसेच मंदिर व परिसरातील आरोग्य आणि सुरक्षिततेस प्राधान्य देत त्यांना सातत्याने सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते. यासाठी आळंदी देवस्थान, आळंदी पोलीस स्टेशन, आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय, पुणे जिल्हा परिषद आरोग्य सेवा, महसूल प्रशासन आणि महावितरण यांनी कंबर कसली होती. प्रस्थान सोहळ्याच्या काळात भाविक व नागरिकांना नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनपूर्व आढावा बैठकीत देण्यात आलेल्या सूचना व आदेशांनुसार प्रशासनाने कामकाज करत विविध सेवा कार्यान्वित केल्या. आळंदीकर ग्रामस्थांनी श्रींच्या पालखीला खांदा देत हरिनाम गजरात पालखी वाहिली.
लक्षवेधी
- अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र; जेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र.
- महिलांसह पुरुषांनी फुगड्या खेळत समानतेचा संदेश देत प्रस्थान सोहळ्यात सहभाग घेतला.
- श्रींचे अश्व माऊली मंदिरात सुमारे सव्वा चार वाजता दाखल झाले.
- इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असतानाही मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
- श्रींच्या वैभवी दर्शनासह मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट करण्यात आली.
- नगरप्रदक्षिणा मार्गावर दिंड्यांचा हरिनाम गजर दुमदुमला.
- आळंदीतील पूल रहदारीसाठी बंद; तत्काळ नियोजनाच्या अभावाची चर्चा.
- आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह.
- माऊली मंदिरात भक्तिमय वातावरणात नामजयघोष.
- प्रस्थानदिनी श्रींच्या अश्वांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले.
- महिलांसह पुरुषांनी फुगड्या खेळत समानतेचा संदेश दिला.
- पुलांच्या कठड्यांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग.
- माऊली मंदिरात तसेच प्रदक्षिणा मार्गावर उर्वरित दिंड्यांचा हरिनाम गजर.
- अलंकापुरीत “ज्ञानोबा-तुकाराम” नामजयघोषात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान.
- इंद्रायणी नदीला महापूर; भाविकांचे पवित्र स्नानाचे स्वप्न भंगले.

