-किनगाव राजा मार्गे रेती वाहतुकीचे आरोप; महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : सिंदखेडराजा तालुक्यात रेती वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, दुसरबीड येथील रेती ठेकेदारांच्या एका पावतीच्या आधारे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक आणि साठेबाजी होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत. विशेषतः किनगाव राजा मार्गे रेतीची वाहतूक सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एका वैध पावतीचा वापर करून अनेक वेळा अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्याय होऊ शकतो, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित मार्गावरून रेतीची वाहतूक होत असल्याच्या चर्चा असतानाही महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि परिवहन विभाग यांच्या कारवाईबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “वाहने रस्त्यावरून जात असताना आणि रेतीचे साठे उभे राहत असताना संबंधित यंत्रणांच्या नजरेतून हे प्रकार कसे सुटतात?” असा सवाल परिसरात उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रेती वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावत्यांची ऑनलाइन पडताळणी, वाहनांची तपासणी तसेच संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. तसेच किनगाव राजा मार्गावर विशेष तपासणी पथक नेमून प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान, तालुक्यातील काही भागांत मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करून ठेवण्यात आल्याची चर्चा असून, हे साठे अधिकृत परवानगीनुसार आहेत की नाहीत, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित साठ्यांची कागदपत्रे, परवानग्या आणि वाहतूक नोंदींची पडताळणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे तसेच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर हे रेती वाहतूक आणि रेती साठ्यांबाबत कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित विभागांकडून नियमांनुसार तपासणी, पडताळणी आणि आवश्यक त्या कारवाया करण्यात येतील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वास्तव परिस्थिती स्पष्ट करावी आणि नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलल्यास वस्तुस्थिती जनतेसमोर येण्यास मदत होईल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
बाॅक्स
तालुक्यातील रेती साठ्यांकडे प्रशासनाचे लक्ष कधी?
सिंदखेडराजा तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास रेतीचे साठे असल्याची चर्चा असून, हे साठे नियमांनुसार आहेत का, याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित रेती साठ्यांची कागदपत्रे, परवानग्या आणि वाहतूक नोंदींची पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आता संबंधित विभागांकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

