सिंदखेडराजा तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आतापर्यंत केवळ १७२ मिमी पावसाची नोंद; रिपरिप पावसामुळे पेरण्यांना विलंब, शेतकरी चिंतेत

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील सातही महसूल मंडळांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केवळ रिपरिप पाऊस सुरू असून, याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. तालुक्यात आतापर्यंत केवळ १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दररोज हलका पाऊस पडत राहिला. मात्र, या पावसामुळे ना शेतातून पाणी वाहिले, ना नदी-नाले खळखळून वाहिले. दररोज पाऊस पडत असला तरी तो दमदार नव्हता. या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू ठेवल्या. ३० जूनपर्यंत सुमारे ५० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, तर उर्वरित ५० टक्के शेतकऱ्यांना रिपरिप पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, एकाही दिवशी पाऊस पूर्णपणे थांबला नाही आणि दमदार हजेरीही लावली नाही. तालुक्यात यंदा सोयाबीनचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर, कपाशीचे २० हजार हेक्टर, हळदीचे २ हजार हेक्टर, तुरीचे ५ हजार हेक्टर, मुग ५०० हेक्टर, उडीद ५०० हेक्टर, संकरित ज्वारी ५०० हेक्टर, मका ५०० हेक्टर तसेच इतर पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे.

७ जुलैपर्यंतच्या पावसाच्या नोंदीनुसार सिंदखेडराजा मंडळात १८५.०९ मिमी, किनगावराजा मंडळात १५९.०९ मिमी, मलकापूर पांग्रा मंडळात २२६.०६ मिमी, दुसरबीड मंडळात १६४.०८ मिमी, सोनोशी मंडळात १४३.०१ मिमी, शेंदुर्जन मंडळात २०८.०१ मिमी आणि साखरखेर्डा मंडळात १५९.०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही तालुक्यातील नदी-नाले खळखळून वाहिलेले नाहीत. विहिरींची पाणीपातळीही अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही. तरीदेखील शेतकऱ्यांनी निसर्गावर विश्वास ठेवत लागवडीचा जुगार खेळला आहे. या जुगारात अनेकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. मात्र, शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा निसर्गावर विश्वास ठेवला आहे. सर्वच मंडळांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने आता जुलै महिन्यात दमदार पाऊस होतो का, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version