प्रयागबाई कापसे यांचे निधन; समाजसेवेचा वसा जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-परमहंस श्री तेजस्वी महाराज वारकरी दिंडीच्या सेवेत आयुष्यभर योगदान; मलकापूर पांग्रा गावात शोककळा

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गेल्या ३५ वर्षांपासून वृत्तपत्र वितरणाची परंपरा जपणाऱ्या कापसे परिवारातील आधारस्तंभ आणि परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या निस्सीम भक्त प्रयागबाई भरत कापसे (वय ८०) यांचे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने मलकापूर पांग्रा गावावर शोककळा पसरली आहे.

कापसे परिवाराने अनेक वर्षे समाजसेवा आणि ग्रामस्थांच्या सेवेला प्राधान्य दिले. स्व. भरत कापसे हे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कार्यरत असताना वृत्तपत्र वितरणाचे कामही प्रामाणिकपणे करत असत. गावातील सर्वसामान्य नागरिकांची अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी पुत्र पांडुरंग कापसे यांनी समर्थपणे सांभाळली. प्रयागबाई कापसे यांची परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्यावर अपार श्रद्धा होती. त्या नियमितपणे श्रीक्षेत्र वरोडी येथे दर्शनासाठी जात असत. विशेष म्हणजे, ७ जुलै रोजी परमहंस श्री तेजस्वी महाराज वारकरी दिंडीचे वरोडी येथून प्रस्थान झाले असून, ८ जुलै रोजी मलकापूर पांग्रा येथे दिंडीच्या भोजनाची व्यवस्था कापसे परिवाराकडे होती.

आईच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून दिंडीतील वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, या भावनेतून कापसे परिवाराने भोजन व्यवस्थेची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड, राजू साळवे, भागवत देशमुख, अमोल साळवे तसेच स्थानिक पत्रकारांवर सोपविली. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रयागबाई कापसे या मायाळू, प्रेमळ आणि धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात बाळकृष्ण आणि पांडुरंग ही दोन मुले, दोन मुली तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवार, ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता मलकापूर पांग्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रयागबाई कापसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Share This Article
Exit mobile version