पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; चिखलीतील नेवाळे वस्तीत घरांमध्ये पाणी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-तीन तासांत ६५ मिमीहून अधिक पावसाची नोंद; नागरिकांचे मोठे नुकसान, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडीसह चिखली परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले. हवामान विभागाच्या नोंदीनुसार चिखली परिसरात अवघ्या तीन तासांत ६५ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.

चिखली येथील नेवाळे वस्ती परिसरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दुपारी सुमारे ३ वाजता सुरू झालेल्या पावसामुळे अवघ्या तासाभरात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. नालेसफाई न झाल्याने तसेच जलनिस्सारण व्यवस्था तुंबल्यामुळे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याचे नागरिकांनी सांगितले. या पावसामुळे अनेक घरांतील धान्य, कपडे, फर्निचर तसेच टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले. घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागून प्रयत्न करावे लागले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.

दुपारपासून परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. मोबाईल चार्जिंग, पिण्याचे पाणी आणि इतर दैनंदिन गरजांवरही त्याचा परिणाम झाला. नेवाळे वस्तीतील नागरिकांनी दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप केला. महापालिकेने तातडीने पाणी उपसण्याची व्यवस्था करावी, नालेसफाई नियमित करावी, खंडित वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील २४ तासांत पिंपरी-चिंचवड परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share This Article
Exit mobile version