परमहंस श्री तेजस्वी महाराज वारकरी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

साखरखेर्डा नगरीत फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत; भाविकांकडून चहा, पाणी व भोजनाची सेवा

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : श्रीक्षेत्र वरोडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या परमहंस श्री तेजस्वी महाराज वारकरी पायी दिंडीचे सोमवारी (दि. ७ जुलै) साखरखेर्डा येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

श्रीक्षेत्र वरोडी येथील तेजस्वी महाराज संस्थानच्या वतीने ह.भ.प. प्रकाश महाराज मगर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शेकडो वारकऱ्यांसह पायी दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होते. यंदा या दिंडीचे पाचवे वर्ष असून, सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात भावभक्तीपूर्ण वातावरणात दिंडीचे श्रीक्षेत्र वरोडी येथून प्रस्थान झाले. दुपारी सुमारे १ वाजता दिंडी साखरखेर्डा येथे पोहोचताच देऊळगाव माळी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज टी-पॉइंट येथे फटाक्यांच्या आतषबाजीत तिचे भव्य स्वागत करण्यात आले. सहकार विद्या मंदिर तसेच पैनगंगा सहकारी सूत गिरणी परिसरातील भाविकांनी वारकऱ्यांना चहा, पाणी आणि बिस्किटांचे वाटप करून सेवाभाव जपला. या पायी दिंडीत तेजस्वी महाराज संस्थानचे विश्वस्त विजय जाधव तसेच युवा सेना नेते योगेश पंजाबराव जाधव हेही सहभागी झाले आहेत. दिंडीचे स्वागत सरपंच ज्योती अमित जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, श्रीधर काळे, किरण कोतवाल, शिवा पाझडे, अशोक इंगळे, डी. एन. पांचाळ, रामदाससिंग राजपूत, आशिष पोंधे, तेजराव ठोसरे आदी मान्यवरांनी केले.

यावेळी साखरखेर्डा येथील होळकर भजनी मंडळ, संत सावता माळी भजनी मंडळ तसेच महिला, पुरुष आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेत दिंडीत सहभाग नोंदविला. ही पायी वारकरी दिंडी दर कोसावर मुक्काम करत १८ दिवसांचा प्रवास पूर्ण करून शुक्रवार, २४ जुलै रोजी आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर येथे दाखल होणार आहे. दिंडीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले असून मुक्कामाच्या ठिकाणी दररोज सायंकाळी श्री हरिपाठ व आरती, रात्री हरिकीर्तन आणि पहाटे काकडा भजनाचा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. वारकऱ्यांच्या भोजनाची तसेच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक साहित्य व सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. साखरखेर्डा ग्रामस्थांनी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यानंतर दिंडीने शेंदूरजनकडे प्रस्थान केले असून सोमवारी रात्रीचा मुक्काम शेंदूरजन येथे होणार आहे.

Share This Article
Exit mobile version