-विद्यार्थिनींना ११२ वर तक्रार करण्याचे आवाहन; उपनिरीक्षक द्रौपदी साळवे यांचे मार्गदर्शन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : माध्यमिक शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी महिलांनी व विद्यार्थिनींनी निर्भयपणे तक्रार करावी. अशा प्रकारच्या घटना घडल्यास दामिनी पथकाशी त्वरित संपर्क साधावा. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक सदैव सज्ज आहे, असा इशारा दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक द्रौपदी साळवे यांनी दिला.
महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी दामिनी पथकाची स्थापना केली असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोणत्याही महिला किंवा विद्यार्थिनीला छेडछाड अथवा अन्य प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर तक्रार नोंदवावी. काही मिनिटांतच तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे द्रौपदी साळवे यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या संकल्पनेतून दामिनी पथकाने सोमवारी (दि. ७ जुलै) साखरखेर्डा येथील एस.ई.एस. हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज तसेच कै. भास्करराव शिंगणे कला, नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय येथे भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी पोलीस कर्मचारी वैष्णवी काळे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थिनींना कायदेशीर हक्क, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे आणि तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिला व विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास असल्यास ०७२६२-२४२४०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

