आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर; जनजीवन विस्कळीत, ४०८ नागरिक व भाविकांना सुरक्षितस्थळी हलविले

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-सर्व पूल पाण्याखाली; पालखी रथ सुरक्षितस्थळी हलविला, नवीन रथाचे लोकार्पण पुढे ढकलले

आळंदी (अर्जुन मेदनकर) : इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर आला असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीवरील सर्व पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. प्रशासनाने वेळीच बचावकार्य राबवत सुमारे ४०८ नागरिक व भाविकांना, तसेच २० पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश मिळविले आहे. याशिवाय सुमारे १५० जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

महापुरामुळे गोपाळपूर, सिद्धबेट, भराव रस्ता, वाहनतळ, श्रीराम मंदिर परिसर आणि नदीकाठील अनेक भाग जलमय झाले आहेत. नदीकाठील नागरिक व भाविकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी महसूल, पोलीस, अग्निशमन दल, नगरपरिषद आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने युद्धपातळीवर बचावकार्य राबविले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या भक्तनिवासात अडकलेल्या २० पोलीस कर्मचाऱ्यांची पीएमआरडीएच्या आपत्ती प्रतिसाद पथकाने सुखरूप सुटका केली. तसेच आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुका वाहून नेणारा नवीन व जुना रथ पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षितस्थळी हलविण्यात आला आहे. त्यामुळे आज (६ जुलै) होणारा नवीन रथाचा लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा ८ जुलै रोजी होणार आहे.

मात्र सध्याच्या पूरस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने वारकरी आणि भाविकांनी शक्यतो पुणे येथून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, तसेच आळंदीत अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे. महापुरामुळे आळंदीचा बाह्य संपर्क तुटला असून स्कायवॉकवरील दर्शनबारी पाण्याखाली गेली आहे. काही पत्रे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. पीसीएमटी बसस्थानक परिसर, स्मशानभूमी, गोपाळपूर, सिद्धबेट, भक्तनिवास, व्यापारी संकुलातील तळमजल्यावरील दुकाने आणि इतर अनेक भागांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वीजपुरवठा आणि संपर्क यंत्रणाही विस्कळीत झाली आहे.

गोपाळपूर, सिद्धबेट, ज्ञानेश्वरी मंदिर, राम मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरमधून १००, ठाकूरबुवा मंडप परिसरातून ६० आणि गोपाळपूर येथून २८ अशा एकूण ४०८ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या संपूर्ण बचावकार्यात मुख्याधिकारी माधवराव खांडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, प्रांताधिकारी अनिल दौंडे, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले. भैरवनाथ ग्रामदेवता ट्रस्टच्या जागेवरील जर्मन हँगरमध्ये भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून, तेथील पाणी जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. हजारो भाविकांची तेथे व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांनी दिली.

Share This Article
Exit mobile version