साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयातील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची पाहणी; १५ ऑगस्टपूर्वी रुग्णालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सोमवारी (६ जुलै) केली. यावेळी काही कामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्या तातडीने दूर करून उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ग्रामीण रुग्णालय उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. २०१४ मध्ये आमदार झाल्यानंतर डॉ. शशिकांत खेडेकर यांनी हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडून ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळवून दिली. त्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून रुग्णालयाच्या इमारतीसाठी १४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच निवासी इमारतीसाठी स्वतंत्र ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. रुग्णालयात अग्निसुरक्षा व्यवस्था (फायर फायटिंग सिस्टीम) उभारण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ते काम पूर्ण झाले आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी डॉ. खेडेकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयातील २६ पदांच्या भरतीस नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. १५ ऑगस्टपूर्वी ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने सध्या कामांना वेग देण्यात आला आहे. पाहणीदरम्यान उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी उपविभागीय अभियंता सचिन वाघ, कनिष्ठ अभियंता संतोष आढाव आणि कनिष्ठ अभियंता अनिल बढे यांनी पुढील १५ दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्षात साकार होत असून लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख बाबूराव मोरे, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, युवा सेना तालुकाप्रमुख संदीप मगर, माजी सरपंच तथा साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर शुक्ल, दिलीप सोभागे, विठ्ठल गायकवाड, संदीप खिल्लारे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version