-संत्रीची झाडे उन्मळून पडली; पेरणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर फेरपेरणीचे संकट
वर्धा (प्रकाश कथले) : आष्टी तालुक्यातील दाऊतपूर शिवारात बाकळी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने अनेक शेतांतील पिके उद्ध्वस्त झाली असून पेरणी केलेल्या शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर फेरपेरणीचे संकट ओढवले आहे. तसेच पुराच्या प्रचंड वेगामुळे अनेक संत्रीची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.
अद्यापही अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही. त्यामुळे शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. कविता ठाकरे यांच्या संत्रीबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक मोठी संत्रीची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत.
नयना धामनदे यांच्या शेतातील पेरणी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली असून श्री. मडघे यांच्या शेतातील पेरणीही पूर्णपणे खरडून गेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा फेरपेरणी करावी लागणार आहे. मात्र शेतात मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचल्याने फेरपेरणीसाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय पेरणीसाठी वापरण्यात आलेले महागडे बियाणेही पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले आहे. बाकळी नदीच्या पुराने दाऊतपूर शिवारातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच भविष्यात पुराचा धोका कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.