जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचा विजय; धानोरेच्या संपदा गावडेची सीए अंतिम परीक्षेत यशस्वी झेप

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-शेतकरी कुटुंबातील कन्येने चार्टर्ड अकाउंटंट बनत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

आळंदी (प्रतिनिधी): आळंदीजवळील धानोरे येथील शेतकरी कुटुंबातील कु. संपदा अलका दत्तात्रय गावडे हिने देशातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपदा ही धानोरे येथील प्रगतिशील शेतकरी कुटुंबातील असून, तिचे वडिल दत्ता धोंडीबा गावडे हे गावचे माजी चेअरमन होते. ग्रामीण भागातून कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन करून अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. संपदाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, धानोरे येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण आळंदी देवाची येथे पूर्ण केले. प्राथमिक शिक्षणादरम्यान मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, शिक्षक बाजीराव भाडळे आणि शिक्षिका शर्मिला भगत यांच्या मार्गदर्शनाचा तिला लाभ झाला. सीए अभ्यासक्रमातील आर्टिकलशिप तिने सीए हर्षल ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण मेहनत, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने सीए अंतिम परीक्षेत यश मिळवले.

चार्टर्ड अकाउंटंट म्हणून समाज, उद्योगविश्व आणि राष्ट्राप्रती प्रामाणिकपणे, नैतिकतेने व व्यावसायिकतेने योगदान देण्याचा आपला निर्धार असल्याचे संपदाने सांगितले. तिचे हे यश नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची आणि भविष्यात आणखी मोठी शिखरे गाठण्याची प्रेरणा देणारे असल्याची भावना तिने व्यक्त केली. संपदाच्या या यशामुळे धानोरे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिचे यश प्रेरणादायी ठरत असून, मेहनत, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे तिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

Share This Article
Exit mobile version