नाली सफाईला वेग; पाण्याचे मार्ग मोकळे, ग्रामपंचायतीचा पुढाकार

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढण्यास सुरुवात; सांडपाणी व्यवस्थापनाला मिळणार दिलासा

साखरखेर्डा (अशोक इंगळे): येथील अनेक वर्षांपासून नाल्यांची नियमित सफाई न झाल्याने गावातील सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले होते. नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर ग्रामपंचायतीने पुढाकार घेत नाली सफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

साखरखेर्डा गावाची लोकसंख्या सुमारे २५ हजार असून गावात सहा प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात सरासरी चार हजार नागरिक वास्तव्यास आहेत. रस्ते, सांडपाणी व्यवस्थापनासाठी नाल्या आणि दिवाबत्ती या मूलभूत सुविधा नागरिकांसाठी अत्यावश्यक आहेत. गावातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले असून विविध ठिकाणी नाल्यांचीही उभारणी करण्यात आली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून सफाई न झाल्याने नाल्या कचऱ्याने आणि गाळाने तुडुंब भरल्या होत्या. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन वाहत होते. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनत असून पावसाच्या पाण्यासोबत नाल्यांतील कचरा रस्त्यावर येत असल्याने सर्वत्र अस्वच्छता निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने मेहकर येथून मजूर बोलावून नाली सफाई मोहीम सुरू केली आहे. वार्ड क्रमांक २ मधील महाराणा प्रताप नगर परिसरात सर्वाधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. उपसरपंचांचे पती संग्रामसिंह राजपूत यांनी स्वतः नालीत उतरून गाळ काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेत त्या भागातील नाल्यांची संपूर्ण सफाई केली. तसेच माळीपुरा परिसरातील अनेक नाल्या तुंबल्या होत्या. वार्ड क्रमांक ३ आणि ४ मधील चेंबर उघडून गाळ काढण्यात आला असून वार्ड क्रमांक ५ आणि ६ मधील नाल्यांचीही सफाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी अद्याप गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू असून घनकचरा व्यवस्थापनालाही प्राधान्य देत ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे.

■ प्रतिक्रिया

“गावाच्या आरोग्यासाठी घनकचरा व्यवस्थापन आणि नाल्यांची नियमित सफाई अत्यावश्यक आहे. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढून त्याची गावाबाहेर योग्य विल्हेवाट लावली जात आहे.”

सौ. ज्योती अमित जाधव, प्रशासकीय सरपंच, साखरखेर्डा

“स्वच्छता ही प्रत्येकाची प्रथम जबाबदारी आहे. नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळावे यासाठी नाली सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.”

मनोज मोरे, ग्रामपंचायत अधिकारी, साखरखेर्डा

Share This Article
Exit mobile version