मिसाळवाडी धरणातून विसर्ग; पुरामुळे गावाचा संपर्क तुटला, लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतरही पूल कागदावरच!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

शेतकरी आणि विद्यार्थ्यांची प्रचंड कोंडी; दरवर्षीच्या या भीषण समस्येवर पक्का पूल बांधण्यास प्रशासनाची टाळाटाळ!

चिखली (अंकुश पाटील) : चिखली तालुक्यातील मिसाळवाडी, पिंपळवाडी, शेळगाव आटोळ आणि देऊळगाव घुबे परिसरात गेल्या 48 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या दमदार पावसामुळे मिसाळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्याने मिसाळवाडी नदीला भीषण पूर आला आहे. या पुरामुळे मिसाळवाडी गावाचा तालुका आणि सभोवतालच्या परिसराशी असलेला संपर्क काल पुन्हा एकदा पूर्णपणे तुटला होता. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांची प्रचंड कोंडी झाली होती.

काल (शनिवारी) दुपारच्या सुमारास नदीच्या पाणीपातळीत अचानक प्रचंड वाढ झाली. पाण्याचा प्रवाह एवढा तीव्र होता की, नदीवरील सखल रस्त्यावरून वाहतूक करणे अशक्य झाले. यामुळे शाळा-महाविद्यालयात गेलेले विद्यार्थी, शेतात गेलेले शेतकरी आणि कामानिमित्त बाहेर पडलेले ग्रामस्थ दोन्ही बाजूंना अडकून पडले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे मिसाळवाडीत काही काळ अभूतपूर्व आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांना पुराचे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली.


दरम्यान, अजून विसर्ग नाही तरी दोन ओढे गोसायखोरीचे आणि खोर्‍याचे ओढे यामुळेच गावाचा संपर्क तुटला असून,,मी स्वतःच काल तिथ होतो. तलाव भरणे बाकी आहे. अशी माहिती बुलढाणा जिल्हा माजी कोषागार अधिकारी व मिसाळवाडी गावाचे भूमिपुत्र दिनकर बावस्कर यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे.


दरवर्षीची ‘ती’च कहाणी; ग्रामस्थांमध्ये संताप

मिसाळवाडी ग्रामस्थांसाठी हा अनुभव नवा नाही. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आला की गावाचा संपर्क तुटतो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात नेणे किंवा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणेही अशक्य होऊन बसते. दर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या या भीषण परिस्थितीमुळे प्रशासनाच्या कारभारावर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिसाळवाडी येथे पक्क्या पुलाची निर्मिती व्हावी, यासाठी गावाचे उपसरपंच हनुमान मिसाळ आणि ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे सातत्याने यशस्वी पाठपुरावा केला आहे. आमदार मनोज कायंदे यांच्यासह चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्याकडेही या पुलाच्या मंजुरीसाठी वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींकडून सकारात्मक आश्वासने मिळाली असली, तरी अद्याप या पुलाच्या प्रस्तावाला अंतिम ‘प्रशासकीय मान्यता’ मिळालेली नाही. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा का?

चिखली तालुक्यातील या भागात दरवर्षी पावसाचा जोर अधिक असतो. हे ठाऊक असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने या पुलाच्या मंजुरीसाठी संथ गतीने काम केल्याचे दिसून येते. आता मिसाळवाडी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीला वारंवार पूर येणार आहे.  मात्र, एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी शासनाने या पुलाला तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन काम सुरू करावे, अशी आग्रही मागणी आता मिसाळवाडी आणि परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Share This Article
Exit mobile version