लोणारच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळशेट्टीवार यांची ठाणे येथे बदली

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण निरोप; लोकाभिमुख कार्याचा गौरव

लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यात आपल्या लोकाभिमुख, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीमुळे आरोग्य विभागात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळशेट्टीवार यांची प्रशासकीय बदली ठाणे येथे झाली आहे. यानिमित्त लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला.

डॉ. बाळशेट्टीवार यांच्या कार्यकाळात लोणार तालुक्यातील ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा मिळाली. दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच आरोग्य विभागाच्या विविध शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी त्यांनी पत्रकार संघाचे सातत्याने सहकार्य घेतले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेत पत्रकार संघाच्या वतीने विशेष निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास लोणार तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक डॉ. अनिलभाऊ मापारी, कार्याध्यक्ष गोपाल तोष्णीवाल, सचिव सचिन गोलेच्छा, सदस्य शेख समद, रहेमान नौरंगाबादी आणि किशोर मोरे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन डॉ. बाळशेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, “संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी” म्हणून त्यांचा कार्यकाळ कायम स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त केल्या. प्रशासकीय बदली ही नियमित प्रक्रिया असली तरी लोणार तालुक्याला त्यांच्या कार्याची उणीव निश्चितच भासेल, असे मतही पत्रकारांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. बाळशेट्टीवार भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “लोणार तालुक्यात कार्यरत असताना स्थानिक पत्रकार संघाने नेहमीच सकारात्मक आणि रचनात्मक सहकार्य केले. आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा राहिला. लोणारकरांचे प्रेम आणि पत्रकारांचे सहकार्य मी ठाणे येथे नवीन जबाबदारी सांभाळतानाही सदैव स्मरणात ठेवेन.” कार्यक्रमाच्या शेवटी लोणार तालुका पत्रकार संघाच्या वतीने डॉ. बाळशेट्टीवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Share This Article
Exit mobile version