-जलपर्णीचा वाढता प्रादुर्भाव, प्रदूषण रोखण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका व प्रशासन अपयशी; पालखी सोहळ्यापूर्वी स्वच्छतेची मागणी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीला वाढते जलप्रदूषण, जलपर्णीचा विळखा आणि फेसाळलेल्या पाण्याचे ग्रहण लागल्याने भाविक, वारकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरही नदीतील प्रदूषण कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नदीतील जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहून येत असून पांढऱ्या फेसासह प्रदूषित पाणी नदीवर तरंगताना दिसत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे. आळंदीसह इंद्रायणी नदीच्या विविध भागांत जलपर्णीची समस्या कायम असून ती केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे काम सुरू असल्याची टीका होत आहे. जलपर्णी ही नदीतील वाढत्या प्रदूषणाचीच निशाणी असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून रासायनिक व मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी पुन्हा पांढऱ्या फेसाने भरून वाहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवघ्या काही दिवसांवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान येऊन ठेपले असताना इंद्रायणी नदी व परिसरातील अस्वच्छता तीर्थक्षेत्र विकासाच्या दाव्याला छेद देणारी असल्याची चर्चा भाविकांमध्ये सुरू आहे. हरिनाम सप्ताह आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभावी स्वच्छता व प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीकाही होत आहे. इंद्रायणी घाटावरील विकासकामांदरम्यान घाटाची तोडफोड झाल्याने त्याचे विद्रूपीकरण झाले असून याबाबत वारकरी व नागरिकांमध्ये नाराजी आहे. नदी प्रदूषणमुक्तीसाठी विविध सामाजिक संस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला असला तरी प्रत्यक्ष उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
जोग महाराज प्रासादिक दिंडीचे मार्गदर्शक हभप विचारसागर महाराज लाहुडकर म्हणाले, “शासनाने सिमेंटीकरण आणि घाट विकासापेक्षा इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रदूषणमुक्त नदी हीच तीर्थक्षेत्राच्या विकासाची खरी ओळख ठरेल.” इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे आळंदी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम झाला आहे. पाणी साठवण बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी व जलपर्णी येत असून बंधाऱ्याची गळती आणि दुरवस्था यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. देहू रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आणि आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदने देऊन इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र, पुणे जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नदीतील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याची टीका त्यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी पुन्हा आळंदीकडे वाहून येत आहे. आळंदी स्मशानभूमी परिसरात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि जलपर्णी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घाट परिसरात सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे घाटाचे विद्रूपीकरण झाल्याची टीका होत आहे. पर्यायी सांडपाणी वाहिनीची व्यवस्था उपलब्ध असतानाही घाटाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विकासकामांनंतर घाट पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप दर्जेदार दुरुस्ती न झाल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.
चौकट : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने इंद्रायणी नदीतील प्रदूषण सातत्याने वाढत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नदी प्रदूषणमुक्त करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि वारकरी संघटनांनी केली आहे. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेची कामे सुरू असून घाट परिसरात जलपर्णी हटविण्यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून येणारे सांडपाणी आणि जलपर्णी ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.