-भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाला नागरिकांनी द्यावे सहकार्य; आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन
लोणार (वाजिद खान) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घराघरांत जाऊन मतदारांची नोंदणी व पडताळणी करीत आहेत. या प्रक्रियेला नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले आहे.
शेख समद यांनी सांगितले की, बीएलओ आपल्या घरी आल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. माहिती न दिल्यास किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास संबंधित व्यक्ती मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असून, मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. मतदार पडताळणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि फॉर्म भरताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, असेही त्यांनी आवाहन केले. यामध्ये आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक तसेच फॉर्मसाठी दोन नवीन रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक आहेत. ज्यांच्याकडे छायाचित्रे उपलब्ध नसतील त्यांनी ती तातडीने काढून ठेवावीत, असेही त्यांनी सांगितले.
चौकट : नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
बीएलओ आपल्या घरी आल्यानंतर त्यांना फॉर्म भरण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्या. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील इतर नागरिकांनाही याबाबत माहिती द्या. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
– शेख समद शेख अहमद
शहराध्यक्ष, काँग्रेस कमिटी, लोणार

