-वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या १,४०० मानाच्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि सामाजिक समतेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी वारीत सहभागी होत असतात. वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २०२४ मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना केली असून, त्यामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. यावर्षी आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये या प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेला २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अनुदानाचे वितरण मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे आवश्यक प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, “राज्य शासन वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे जतन, संवर्धन आणि वारकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.”

