विधानसभेत घुमला देवळी–पुलगावच्या समस्यांचा आवाज

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-पाणी, आरोग्य, रस्ते व विकासकामांबाबत आमदार राजेश बकाने यांनी सरकारचे वेधले लक्ष

वर्धा (प्रकाश कथले) : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते आणि विकासाशी संबंधित विविध मूलभूत प्रश्नांवर आमदार राजेश बकाने यांनी सातत्याने आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. प्रश्न, लक्षवेधी सूचना, औचित्याचे मुद्दे आणि विविध निवेदनांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या समस्या सभागृहात प्रभावीपणे मांडत त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

मतदारसंघातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी असलेल्या नाचणगाव आणि वायगाव येथील वाढती लोकसंख्या व भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी, अशी मागणी आमदार बकाने यांनी केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. आरोग्य सुविधांबाबत बोलताना त्यांनी पुलगाव येथे स्वतंत्र महिला व शिशु रुग्णालय उभारण्याची तसेच पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन तेथे तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक मनुष्यबळ आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागण्या पूर्ण झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले. मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करताना आमदार बकाने म्हणाले, “आज देवळी–पुलगाव मतदारसंघात रस्ता कोणता आणि पांदण कोणती हे ओळखणे कठीण झाले आहे.” अनेक प्रमुख आणि ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी तातडीने मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली.

याचबरोबर आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत सुरू असलेल्या दहेगाव–देवळी–वायगाव–कानगाव–कात्री या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातील कंत्राटदारांच्या निष्काळजीपणा आणि नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टांचाही मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. रस्त्यावरील धूळ, वाहतुकीतील अडथळे, अपूर्ण कामे आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे सांगत संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून कामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. अधिवेशनादरम्यान आमदार बकाने यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी, पायाभूत सुविधा, आरोग्य, पाणीपुरवठा आणि जनहिताशी संबंधित अन्य प्रश्नांवरही सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. केवळ प्रश्न उपस्थित करण्यापुरते मर्यादित न राहता त्यावर ठोस निर्णय होऊन विकासकामांना गती मिळावी, यासाठी त्यांनी सभागृहात प्रभावीपणे भूमिका मांडली.

Share This Article
Exit mobile version