अहिल्यानगरच्या सुपुत्राची थायलंडमध्ये सुवर्ण झेप!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आशियाई कुस्ती स्पर्धेत कझाकिस्तानच्या पैलवानावर थरारक विजय; हर्षद चेमटेने पटकावले सुवर्णपदक, शेवगाव तालुक्याचा उंचावला मान

शेवगाव (बाळासाहेब खेडकर): अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावचा युवा कुस्तीपटू हर्षद चेमटे याने थायलंड येथे सुरू असलेल्या १५ वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात त्याने कझाकिस्तानच्या बलाढ्य कुस्तीपटू येरसुल्तान सुलेमान याच्यावर ११-१० अशा अत्यंत थरारक फरकाने मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

अंतिम सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा ठरला. दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. कझाकिस्तानच्या खेळाडूने जोरदार प्रतिकार केला; मात्र हर्षदने आपल्या तांत्रिक कौशल्याचा, वेगवान चालींचा आणि आक्रमक डावपेचांचा प्रभावी वापर करत शेवटच्या क्षणापर्यंत संयम राखला. अखेर एका गुणाच्या निसटत्या फरकाने विजय मिळवत त्याने भारताच्या नावावर सुवर्णपदकाची नोंद केली. अवघ्या १५ वर्षांखालील वयोगटात खेळत असतानाच हर्षदने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने केवळ स्वतःचेच नव्हे, तर महाराष्ट्र, अहिल्यानगर जिल्हा आणि शेवगाव तालुक्याचे नावही आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात उज्ज्वल केले आहे. हर्षदच्या या दैदिप्यमान यशाची बातमी समजताच शिंगोरी गावासह संपूर्ण शेवगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी, विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही तो भारतासाठी अशीच पदके जिंकत देशाचा तिरंगा जगभरात अभिमानाने फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंनाही हर्षदच्या या यशातून नवी प्रेरणा मिळाली आहे. जिद्द, मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर जागतिक स्तरावरही यश मिळविता येते, हे हर्षद चेमटेने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.

Share This Article
Exit mobile version