-आठ मंजूर पदांपैकी दोन पदे रिक्त; १८० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
वझर आघाव (वाजिद खान) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वझर आघाव येथील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्याचा थेट परिणाम तब्बल १८० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाने रिक्त पदे भरण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तातडीने शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शिक्षण विभागाविरोधात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून शाळेसाठी आठ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ सहा शिक्षक कार्यरत असून एक उच्च श्रेणी शिक्षक आणि एक सहाय्यक शिक्षकाचे पद दीर्घकाळापासून रिक्त आहे. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर अनेक वर्गांचा अतिरिक्त ताण पडत असून विद्यार्थ्यांना विषयनिहाय दर्जेदार अध्यापन मिळणे कठीण झाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे. शासन ‘शाळा टिकवा, विद्यार्थी वाढवा’ या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. पालकांनी खासगी शाळांऐवजी जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांना प्रवेश द्यावा, असे आवाहनही सातत्याने केले जात आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षकांची रिक्त पदे महिनोनमहिने भरली जात नसल्याने शासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “शिक्षकच नसतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कोण घडविणार?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रिक्त पदांमुळे कार्यरत शिक्षकांना एकाच वेळी अनेक वर्गांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने तातडीने रिक्त पदे भरावीत, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीने केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, अन्यथा शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाविरोधात मोठ्या प्रमाणावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून तातडीने निर्णय घेतो की पुन्हा आश्वासनांवरच वेळ काढतो, याकडे वझर आघाव येथील पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

