मनमिळाऊ स्वभावाच्या धृपदाबाई नाईक यांचे निधन; धार्मिक व सामाजिक कार्याला वाहिलेले आयुष्य संपले

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आयुर्वेदिक औषधींचे ज्ञान, भजन-कीर्तनाची आवड आणि सर्वांशी आत्मीयतेने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगण्याची वृत्ती जपणाऱ्या साखरखेर्डा येथील धृपदाबाई रामभाऊ नाईक यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मनमिळाऊ स्वभाव, धार्मिक वृत्ती आणि समाजसेवेची ओढ असलेल्या या मातृवत व्यक्तिमत्त्वाला सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

धृपदाबाई नाईक या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्या नियमित सहभागी होत असत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी धार्मिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपली. गावातील अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे त्यांना उत्तम ज्ञान होते. विविध आजारांवर त्या पारंपरिक औषधी देत असत आणि अनेकांना त्याचा लाभही झाला होता. गरजूंना निःस्वार्थपणे मदत करण्याची त्यांची वृत्ती सर्वांनाच परिचित होती.

धृपदाबाई प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत असत. प्रत्येकाला नावाने हाक मारून त्यांची विचारपूस करणे, कुटुंबाची खुशाली जाणून घेणे, मुलांच्या शिक्षणापासून घरातील परिस्थितीपर्यंत आत्मीयतेने चौकशी करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या हसतमुख चेहऱ्यामुळे आणि प्रेमळ वागणुकीमुळे त्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या बनल्या होत्या. उंच व्यक्तिमत्त्व, प्रेमळ स्वभाव आणि समाजाशी असलेली नाळ यामुळे त्या गावात वेगळी ओळख निर्माण करू शकल्या. माळी समाजातील ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या निधनाने समाजातील एक प्रेमळ, धार्मिक आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, त्यांच्या स्मृती कायम प्रेरणादायी राहतील, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. धृपदाबाई रामभाऊ नाईक यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम गुरुवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता साखरखेर्डा येथील भोगावती नदीलगतच्या स्मशानभूमीत आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.

Share This Article
Exit mobile version