-कृषी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा सन्मान; शाश्वत शेतीतील प्रयोगांची शासनाकडून दखल
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव तालुक्यातील घोटण येथील प्रगतशील शेतकरी ॲड. संदीप बबन मोटकर यांना सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथे पार पडला. ॲड. मोटकर यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेती, विद्राव्य सेंद्रिय स्लरीचा वापर तसेच पीक पद्धतीतील बदल करून आधुनिक आणि शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रयोगांमुळे पिकांच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात सकारात्मक वाढ झाल्याने शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक तसेच कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ॲड. संदीप मोटकर यांनी भविष्यातही सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि शेतकऱ्यांमध्ये तिचा अधिकाधिक अवलंब व्हावा यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

