नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; जानकीदेवी विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा; नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तक वितरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी विदर्भातील शाळा सुरू होताच देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवप्रवेशित विद्यार्थ्यांसह पालकांचे स्वागत करून नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे माजी प्राचार्य हरीदास घुबे तसेच गावातील महिला व पुरुष पालकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे वितरण करून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रास्ताविकात संस्थेचे सचिव प्रा. उद्धवराव घुबे आणि मुख्याध्यापक बबनराव लांडगे यांनी विद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेची माहिती देत गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी प्राचार्य हरीदास घुबे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. आगामी शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन करत त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय सावंत यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जानकीदेवी विद्यालय परिसरात आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Share This Article
Exit mobile version