अलंकापुरीत आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-हरिनाम, प्रवचन व कीर्तनांनी भक्तिमय वातावरण; नवीन पालखी रथ, मानाच्या बैलजोडींची पूजा आणि वारीच्या तयारीला वेग

आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी वारी पालखी सोहळा २०२६ निमित्त आयोजित हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. १ ते ८ जुलैदरम्यान हा सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

सप्ताहानिमित्त दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत प्रवचन, तर सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक ज्ञानयज्ञात राज्यातील नामवंत प्रवचनकार अशोक महाराज इदगे, दत्तात्रेय माशेरे महाराज, कृष्णा पडवळ महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, भागवत महाराज साळुंखे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील तसेच प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांची प्रवचन सेवा होणार आहे. तसेच देहूकर महाराज फड, हराळे वैष्णव संस्था, साधकाश्रम संस्था, सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था, भाईजी महाराज मोगलगावकर आणि श्री वालुरकर यांच्या वतीने राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला. यावेळी विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, पुजारी अमोल गांधी, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, मंगेश आरु, राजाभाऊ चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वेदमंत्रांच्या घोषात आणि हरिनामाच्या गजरात सप्ताहाचा शुभारंभ झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी वडील राजेंद्र पवार यांच्यासमवेत पालखी रथ ओढण्याचा मान मिळालेल्या रानवडे कुटुंबाच्या बैलजोडींची पूजा करून पाहणी केली. यावेळी त्यांनी मानकरी कुटुंबीयांशी संवाद साधत बैलजोडींची माहिती जाणून घेतली.

यंदा पालखी रथ ओढण्याचा मान उमेश रानवडे यांच्या हिरा–लाडक्या, तुळशीराम रानवडे यांच्या सुर्या–रामा आणि हर्षवर्धन रानवडे यांच्या भीम–अर्जुन या बैलजोडींना मिळाला आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष देवकाते, विद्यमान नगरसेवक राहुल चिताळकर पाटील, नितीन साळुंखे, अनिकेत कुऱ्हाडे, शीतल रानवडे, पै. शिवाजीराव रानवडे, साहेबराव कुऱ्हाडे, सौरभ रानवडे, सचिन रानवडे, सौरभ गव्हाणे, प्रियेश रानवडे आदी उपस्थित होते. यावर्षी पालखी सोहळ्यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्चून नवीन आकर्षक पालखी रथ तयार करण्यात आला आहे. रथाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, पूर्वीच्या रथापेक्षा सुमारे एक टन वजन कमी असल्याने बैलजोडींना रथ ओढणे अधिक सोयीचे होणार आहे. नक्षीकामाने सजविलेल्या या रथावर मारुती, जय-विजय यांसह विविध देवतांची आकर्षक शिल्पे साकारण्यात आली आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील पीएमपीएमएल बसस्थानक परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. बसस्थानक परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, निवारा शेड, पुरेशी प्रकाशयोजना आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी पीएमपीएमएल प्रशासन व आळंदी नगरपरिषदेकडे केली आहे. आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, महावितरण आणि ग्रामीण रुग्णालय यांच्याकडून पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून सर्वत्र अंतिम तयारी सुरू आहे. संपूर्ण अलंकापुरी आषाढी वारीसाठी सज्ज झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

Share This Article
Exit mobile version