– ३१ लाखांचा हुंडा आणि चारचाकी देऊनही पैशांसाठी लेकीचा बळी; पतीला अटक, मात्र सासू, सासरे आणि नणंद अद्यापही फरार!
– तपासातील संथ गतीमुळे पोलिसांच्या भूमिकेवर नातेवाईकांकडून प्रश्नचिन्ह!
हिवरा आश्रम (अरूणा म्हस्के) – लग्नात तब्बल ३१ लाख रुपये रोख आणि चारचाकी गाडी देऊनही पैशांसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या अमानुष छळाला कंटाळून २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या पतीला अटक करण्यात आली असली, तरी सासू, सासरे आणि नणंद मात्र घटनेला आठवडा उलटूनही पोलिसांना गुंगारा देत फरार आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकरणात पोलीसच उर्वरित आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला असून, पोलिसांच्या एकूणच तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बारई (ता. मेहकर) येथील निवृत्त शिक्षक व शेतकरी रतन श्रीकृष्ण पागोरे यांची मुलगी वैष्णवी हिचा विवाह २२ एप्रिल २०२२ रोजी बाळसमुद्र (साखरखेर्डा) येथील कृषी सहायक असलेल्या गणेश रामेश्वर मेरत याच्याशी झाला होता. लग्नावेळी वरपक्षाच्या मागणीनुसार तब्बल ३१ लाख रुपये रोख आणि एक चारचाकी गाडी हुंडा म्हणून देण्यात आली होती. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांतच पती गणेशचे शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि वाहनाच्या कर्जाचे उर्वरित हप्ते फेडण्यासाठी माहेरहून आणखी पैसे आणावेत, यासाठी वैष्णवीवर दबाव टाकण्यास सुरुवात झाली. पैशांच्या या हव्यासापोटी सासरच्या मंडळींकडून तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छछ केला जात होता.
या अमानुष त्रासाला कंटाळून अखेर २३ जून रोजी मेहकर येथे वैष्णवीने तिच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलासमोरच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या हृदयद्रावक घटनेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती गणेश मेरत याला अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
आरोपी फरार कसे? तपासावर शंका!
गुन्हा दाखल होऊन आठ दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला असला, तरी यातील इतर आरोपी—सासू, सासरे आणि नणंद अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एका गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यातील आरोपी एवढे दिवस मोकाट कसे राहू शकतात? असा संतप्त सवाल आता नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलिसांची तपासातील ही संथ गती अनेक शंकांना वाव देणारी आहे. आरोपींना कोणाचा तरी राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त असावा आणि त्यातूनच पोलीस त्यांना अभय देत असावेत, असा थेट आरोप वैष्णवीच्या नातेवाईकांनी केला आहे. हुंडाबळीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपींना शोधण्यात पोलिसांना येत असलेले अपयश ही पोलिसांची निष्क्रियता आहे की जाणीवपूर्वक केलेली डोळेझाक? असा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवावीत आणि फरार असलेल्या सासू, सासरे व नणंदेच्या तत्काळ मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतरही न्याय मिळण्यास होणारा विलंब व्यवस्थेवरचा विश्वास उडवणारा ठरत आहे.

