सहकार विद्या मंदिर, साखरखेर्डा येथे नवीन शैक्षणिक सत्र २०२६–२७ चा जल्लोषात शुभारंभ

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत; आकर्षक वर्गसजावट, विविध उपक्रम आणि ‘सेल्फी कॉर्नर’ ठरला विशेष आकर्षण

साखरखेर्डा (अंकुश पाटील) : सहकार विद्या मंदिर, साखरखेर्डा येथे शैक्षणिक सत्र २०२६–२७ च्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. संपूर्ण शाळा आकर्षक सजावट, रंगीबेरंगी फुगे आणि स्वागत संदेशांनी सजविण्यात आली होती.

शाळेच्या प्राचार्या मिस. मर्लिन सिल्वेस्टर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. पहिल्या दिवसानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गखोल्या आकर्षक पद्धतीने सजवून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले. प्रत्येक वर्गात ओळख परेड, प्रेरणादायी संवाद, शैक्षणिक खेळ, चित्रकला, गाणी तसेच विविध शैक्षणिक आणि सृजनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत पहिलाच दिवस संस्मरणीय बनविला. यावर्षी प्रथमच उभारण्यात आलेला आकर्षक ‘सेल्फी कॉर्नर’ विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी विशेष आकर्षण ठरला. रंगीबेरंगी सजावटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आनंदाने छायाचित्रे काढून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या अविस्मरणीय आठवणी जतन केल्या. आनंदी वातावरण, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांचे उत्कृष्ट नियोजन यामुळे सहकार विद्या मंदिर येथे शैक्षणिक सत्र २०२६–२७ चा शुभारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.

Share This Article
Exit mobile version