प्राचार्य डॉ. गौतम मगरे यांचा सेवापूर्ती समारंभ हृदयस्पर्शी वातावरणात संपन्न

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-३२ वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक सेवेला मानाचा मुजरा; नवनियुक्त प्राचार्य अजित गायकवाड यांचाही सत्कार

पुणे (अर्जुन मेदनकर) : पुण्यातील विद्या महामंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲड. अभय आपटे यांच्या हस्ते लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम मगरे यांचा सेवापूर्ती निमित्त शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन हृदयस्पर्शी वातावरणात सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष अपर्णा कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. मीनाक्षी मगरे यांचाही सन्मान करण्यात आला.

या समारंभास संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लीलाधर गाजरे, संचालक पवन कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे माजी अध्यक्ष, विद्यमान कार्यकारिणी सदस्य, विविध विभागांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी, डॉ. गौतम मगरे यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी तसेच राज्य व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. गौतम मगरे यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच समारंभात नवनियुक्त प्राचार्य अजित गायकवाड यांचाही सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्राचार्य डॉ. गौतम मगरे यांनी १९९५ ते २०२६ या कालावधीत संस्थेत सुमारे ३२ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी विकास आणि संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. विविध घटकांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारामुळे संपूर्ण कार्यक्रम भावनिक आणि संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीलाधर गाजरे यांनी केले.

प्राचार्य अजित गायकवाड यांनी डॉ. मगरे यांचा परिचय करून दिला, तर सूत्रसंचालन सुमेधा जोशी यांनी केले. उपस्थितांच्या शुभेच्छा आणि कृतज्ञतेच्या भावनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This Article
Exit mobile version