बुलढाणा (सुरेश हुसे) : पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने वर्ष २०२६ मध्ये गुन्हे उकल, अवैध धंद्यांवरील कारवाई, सायबर गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि जनजागृती अभियानांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. वर्षभरात विविध कारवायांमधून पोलिसांनी तब्बल १९ कोटी १९ लाख १५ हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांपैकी ७९ टक्के गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली असून या गुन्ह्यांमधून ४ कोटी ७ लाख ६१ हजार ३२९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन परिवर्तन’ या अंमली पदार्थविरोधी अभियानाने जिल्ह्यात विशेष प्रभाव निर्माण केला आहे. या मोहिमेअंतर्गत ५५ गुन्हे दाखल करून ५८ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून ३२४.८४६ किलो गांजा व अफूसह जवळपास १ कोटी ९९ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. केवळ कारवाईवर भर न देता पथनाट्य, जनजागृती आणि व्यसनमुक्ती अभियानांच्या माध्यमातून युवकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे कामही करण्यात आले. अवैध गौण खनिज अर्थात रेती तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करत ५३ गुन्हे दाखल केले. या प्रकरणात १०१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ५ कोटी ७८ लाख २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याविरोधातही १२ प्रकरणांमध्ये १४ आरोपींना अटक करून १ कोटी ८ लाख ३९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय मद्यविषयक कायद्यांतर्गत १,९८१ गुन्ह्यांमध्ये २,०२८ आरोपींकडून ६६.६२ लाख रुपयांचा, तर जुगारविरोधी ८४२ कारवायांमध्ये १,२१५ आरोपींकडून ४०.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सायबर गुन्ह्यांबाबतही बुलढाणा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नागरिकांचे हरवलेले २१७ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले, तर सायबर फसवणुकीतील १७ लाख २८ हजार १३८ रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश आले. अपहरणाच्या ११० प्रकरणांपैकी ९१ व्यक्तींची सुटका करण्यात आली असून हरविलेल्या ७१८ व्यक्तींपैकी ५१२ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू आहे. वाहतूक नियमभंगाविरोधातही पोलिसांनी व्यापक मोहीम राबवित मोटार वाहन कायद्यान्वये ५५ हजार ९२९ प्रकरणांमध्ये कारवाई करून ४ कोटी १४ लाख ४६ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध ११२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. याशिवाय कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून मोटारसायकल व सायकल रॅली, वृक्षारोपण, डायल ११२ आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती, शाळा-महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भातील विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. वर्ष २०२६ मधील या सर्वसमावेशक कामगिरीमुळे बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम राखत जनतेचा विश्वास संपादन केला असून राज्यातील प्रभावी पोलीस दलांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

