-मुदत संपली… आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा; ‘शेतकऱ्यांना २०२९ पर्यंत झुलवत ठेवण्याचा सरकारचा डाव’
बुलढाणा (सुरेश हुसे) : राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पुन्हा एकदा मुदत वाढविण्यात आल्याने सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
विधानसभेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची मुदत वाढविण्याची घोषणा करताच तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. “सरकारला कर्जमाफी करायचीच नाही. हे केवळ वेळकाढूपणाचे राजकारण असून कमीत कमी शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरतील, हाच सरकारचा छुपा अजेंडा आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. सरकारने सुरुवातीला ३० जूनपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले. आता ती मुदत पुढे ढकलण्यात आली असून पुढे पुन्हा नवी तारीख जाहीर करून अशाच प्रकारे २०२९ पर्यंत शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याचा डाव सरकार आखत असल्याचा आरोपही तुपकर यांनी केला. “शेतकऱ्यांच्या भावना, त्यांचा संयम आणि त्यांच्या संकटाची सरकारला कोणतीही किंमत उरलेली नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला. सरकारचा उद्देश केवळ १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्याचा असून उर्वरित शेतकरी नियमांच्या कचाट्यात अडकून योजनेबाहेर राहतील, अशीच व्यवस्था मुद्दाम तयार केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्यांमध्ये गट-तट निर्माण करून त्यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचाही सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मुदत संपली… आता आंदोलनाचे हत्यार
सरसकट, विनाअट आणि विनाशर्त कर्जमुक्तीसह पीकविमा व इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यानंतर राज्यभरात आंदोलनाची तीव्र लाट उसळली होती. अनेक ठिकाणी रास्तारोको, निदर्शने आणि आंदोलनांची मालिका सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुलढाण्यात येऊन तुपकर यांची भेट घेतली होती. कर्जमुक्तीबाबत सरकारसोबत बैठक आयोजित करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. त्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार करण्यात आले. नुकतेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र सरकारने मागितलेली मुदत संपूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने तुपकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. “सरकारने आता फिरवाफिरवी थांबवावी. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून राज्यव्यापी जनआंदोलन उभारले जाईल,” असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

