बैलगाडीतून चिमुकल्यांचे स्वागत; सावरगाव माळ येथे उत्साहात शाळा प्रवेशोत्सव!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-टाळ-मृदुंगाच्या गजरात प्रभात फेरी; तहसीलदार अजित दिवटे यांचे शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शन

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : सावरगाव माळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त मंगळवारी (दि. ३०) शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील मुख्य रस्त्यांवरून टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नव्याने शाळेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून शाळेत आगमन करून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.

प्रभात फेरी आणि स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. शाळा परिसरात विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले तहसीलदार अजित दिवटे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना संबोधित करताना शिक्षण हेच जीवनातील यशाचे खरे साधन असल्याचे सांगितले. प्रत्येक मुलाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना नियमित शाळेत पाठवावे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सरपंच निवृत्ती कठोरे, उपसरपंच गोदावरी आप्पासाहेब पठारे, ग्रामपंचायत सदस्य रामप्रसाद कठोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कठोरे, ललिता संजय दाभाडे, ग्रामविकास अधिकारी दीपक ठाकरे, अंगणवाडी सेविका ललिता साळवे, मुख्याध्यापक संजय ठाकरे, शिक्षक मनोज तरोडे, आरोग्य सेवक शेळके, भजनी मंडळाचे सदस्य, गावातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकवृंदाने आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेले स्वागत यामुळे सावरगाव माळ येथील शाळा प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.

Share This Article
Exit mobile version