-ताजनापूर योजना पूर्ण करण्यासाठी शेतकरी, युवक व महिलांची निर्णायक बैठक; ग्रामस्तरीय कृती समित्या स्थापन करण्याचा निर्णय
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : “ताजनापूर योजनेचा प्रश्न आता आरपारच्या लढ्याचा बनला आहे. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर राज्याचे उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री तसेच पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून शेतकऱ्यांचा संताप व्यक्त केला जाईल,” असा आक्रमक इशारा ताजनापूर कृती समितीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी दिला.
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’ योजना तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शेवगाव येथील श्री संत गाडगे महाराज छात्रालयात लाभार्थी गावांतील शेतकरी, युवक व महिलांची निर्णायक बैठक पार पडली. यावेळी ॲड. काकडे यांनी लोकप्रतिनिधींवर टीका करत पाण्याच्या प्रश्नावर आता कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “धरण उशाला असूनही शेवगाव तालुका तहानलेला आहे. इतर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी आपल्या भागासाठी पाणी खेचून नेत आहेत; मात्र आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे ताजनापूर योजना रखडली आहे. कोपरे धरणाच्या पाण्याबाबत झालेल्या आश्वासनांप्रमाणे ताजनापूर योजनेचाही बळी जाऊ देणार नाही. पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.”
बैठकीत जुनी ताजनापूर कृती समिती बरखास्त करून नव्या समितीची घोषणा करण्यात आली. लक्ष्मणराव गवळी यांची निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली. तसेच योजनेतील प्रत्येक गावात महिला व युवकांच्या स्वतंत्र ग्रामस्तरीय कृती समित्या स्थापन करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत शेतकऱ्यांनी पाण्याअभावी ऊसासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याची व्यथा मांडली. “दुष्काळी गावात जन्माला आलो, पण दुष्काळी म्हणून मरणार नाही,” अशी शपथ घेत १३ गावांना ताजनापूरचे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीला माणिक म्हस्के, जगन्नाथ गावडे, नवनाथ ढाकणे, लक्ष्मण गवळी, अर्जुन ढाकणे, मधुकर झिरपे, रामजी पोटफोडे, बंडूभाऊ म्हस्के, रामराव ढाकणे, संजय काकडे, प्रमोद तांबे, गोरक्ष भोसले, अरुण खर्चन, मच्छिंद्र भापकर, रंगनाथ ढाकणे, प्रा. दादासाहेब जवरे, विठ्ठल केदार, नारायण टेकाळे यांच्यासह लाभार्थी गावांतील शेतकरी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
ताजनापूरचा लढा पुन्हा पूर्ण ताकदीने हाती घेणार – हर्षदा काकडे
माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे म्हणाल्या, “निवडणूक आली की ताजनापूर आठवते, असा आरोप पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही काही काळ शांत राहिलो. मात्र योजना अद्याप अपूर्ण असल्याने आणि शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव हा लढा पुन्हा पूर्ण ताकदीने सुरू करण्यात येत आहे.”