निकेतन गुरुकुल विद्यालयात ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमाचा भक्तिमय प्रारंभ

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-हरिनामाच्या जयघोषात ग्रंथसंपदा वाटप; विद्यार्थ्यांना संत साहित्याची गोडी लावण्याचा उपक्रम

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री निकेतन गुरुकुल विद्यालयात ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. हरिनामाच्या जयघोषात आणि संत साहित्याच्या ग्रंथसंपदेचे वाटप करून हा उपक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी होते. यावेळी ह.भ.प. विश्वकर्मा महाराज पांचाळ, श्रीराम मंदिराचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, विश्वंभरभाऊ पाटील, कैलास आव्हाळे, माऊली जाधव, संस्थेचे शरद उपाध्ये, अंजली उपाध्ये, कविता उपाध्ये, डॉ. अश्विनी कुलकर्णी, मुख्याध्यापिका मोहिनी भदाणे, पुनम शिरसाठ, समन्वयक स्नेहल कुंभार आदी उपस्थित होते. हरिनामाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. श्रावणी गव्हाणे हिने सुमधुर अभंग गायन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी मान्यवरांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधोरेखित केली. इयत्ता सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी “माऊली… माऊली…”च्या जयघोषात वारकरी संप्रदायातील पारंपरिक पाऊलांचा लयबद्ध आविष्कार सादर केला.

विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत संत साहित्य आणि मूल्यशिक्षणाची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली. तसेच गेल्या वर्षीच्या उपक्रमातील अनुभव सांगत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ हा उपक्रम संस्थेने स्वीकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमास संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता चव्हाण यांनी केले, प्रास्ताविक रश्मी संभे यांनी केले, तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This Article
Exit mobile version