साखरखेर्डा परिसरात सलग पाचव्या दिवशी रिमझिम पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-हळद लागवडीला मोठा दिलासा; कपाशी लागवड आणि सोयाबीन पेरणीला वेग

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गेल्या अनेक दिवसांपासून खंड पडलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावत सलग पाचव्या दिवशीही साखरखेर्डा परिसरात रिमझिम स्वरूपात बरसत राहिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरला असून आता खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. कृषी विभागानेही पेरणीयोग्य पाऊस पडेपर्यंत घाईने पेरणी करू नये, असा सल्ला दिला होता. मात्र, गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काल रात्री रात्रभर झालेल्या रिमझिम पावसानंतर शेतांमध्ये योग्य ओलावा निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला गती दिली आहे. तसेच आजपासून सोयाबीन पेरणीचीही लगबग सुरू झाली असून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतांमध्ये पेरणीची कामे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

साखरखेर्डा परिसरात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून या पिकासाठीही सध्याचा पाऊस अत्यंत पोषक ठरत आहे. कृषी विभागाच्या वतीने अनेक शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वितरण करण्यात आले असून त्याचा लाभही शेतकऱ्यांना होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात यंदा सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित असून त्यामध्ये सोयाबीन ३५ हजार हेक्टर, कपाशी २० हजार हेक्टर, हळद २ हजार हेक्टर, तूर २ हजार हेक्टर, मूग ५०० हेक्टर, उडीद ५०० हेक्टर, संकरित ज्वारी ५०० हेक्टर आणि मका ५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.bसलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये आवश्यक ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

Share This Article
Exit mobile version