-पर्यावरण संवर्धनाचा संदेश; उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या महिलेला पैठणीचे बक्षीस
अंकुश पाटील (चिखली) : वटसावित्री पौर्णिमेनिमित्त चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १०१ वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. धार्मिक परंपरेसोबतच वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विविध गावांमध्ये उत्साहात पार पडला.
हिंदू संस्कृतीमध्ये महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात. धार्मिक महत्त्वाबरोबरच वडाचे झाड वैज्ञानिक दृष्ट्याही अत्यंत उपयुक्त मानले जाते. हे झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करते, उन्हाळ्यात बाष्पीभवनाद्वारे वातावरणातील तापमान कमी करण्यास मदत करते तसेच हवेतील विषारी वायू शोषून पर्यावरण संतुलित ठेवते. पक्षी, खारी, मधमाश्या यांसह अनेक जीवांचे हे महत्त्वाचे आश्रयस्थान असल्याने जैवविविधतेच्या दृष्टीनेही वडाच्या वृक्षाला विशेष महत्त्व आहे. रस्ते व विविध विकासकामांमुळे वडाच्या वृक्षांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिखलीच्या वतीने बेराळा, मुरादपूर, रामनगर, मेरा खुर्द, देऊळगाव घुबे, कोणड, अमोना, मंगरूळ आणि अंचरवाडी या गावांमध्ये एकूण १०१ वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रत्येक गावात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पुढील वर्षभर सर्वोत्कृष्ट पद्धतीने वडाचे रोप संगोपन करणाऱ्या महिलेला पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष शांतनू बोंद्रे, चिखली तालुका अध्यक्ष संतोष परिहार यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्र सुरडकर, भगवान बाप्पू, अनंथा गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, रामेश्वर इंगळे, रमेश अवचार, मापारी ठेकेदार, ग्रामसेवक वीरसाहेब, उपसरपंच रामदास मुजमुले, राजेंद्र घुबे, प्रा. अमोल घुबे, विजय जावळे, प्रल्हाद इंगळे, गजानन पाटीलबा इंगळे, दत्तू गावडे, ग्रामसेवक सोळंकी, दामुअण्णा शिंदे, दत्तात्रय रुपसिंग परिहार, सतीश सोनुने, पांडुरंग भवर आदींसह विविध गावांतील सुवासिनी माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.