वटपौर्णिमेनिमित्त चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून १०१ वडाच्या रोपांचे वाटप

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सर्वोत्कृष्ट संगोपन करणाऱ्या महिलेस पैठणीचे बक्षीस जाहीर

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : वटपौर्णिमेनिमित्त चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १०१ वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. वटसावित्री पौर्णिमेच्या धार्मिक परंपरेला पर्यावरण संरक्षणाची जोड देत हा उपक्रम राबविण्यात आला.

हिंदू संस्कृतीनुसार महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात. धार्मिक महत्त्वाबरोबरच वडाचे झाड वैज्ञानिक दृष्ट्याही अत्यंत उपयुक्त मानले जाते. हे झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) निर्माण करते, उन्हाळ्यात बाष्पीभवनाद्वारे वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण करून तापमान कमी करण्यास मदत करते. तसेच हवेतील विषारी वायू शोषून पर्यावरण संतुलित ठेवण्यास आणि पक्षी, खारी, मधमाश्या यांसारख्या अनेक जीवांचे आश्रयस्थान म्हणून जैवविविधता जपण्यासही महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या रस्ते व विकासकामांमुळे वडाच्या वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने बेराळा, मुरादपूर, रामनगर, मेरा खुर्द, देऊळगाव घुबे, कोनड, अमोना, मंगरूळ आणि अंचरवाडी या गावांमध्ये एकूण १०१ वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रत्येक गावात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पुढील वर्षभर सर्वाधिक चांगल्या प्रकारे वडाचे रोप संगोपन करणाऱ्या महिलेला पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. हा उपक्रम बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शांतनू बोंद्रे यांच्या सहकार्याने पार पडला. चिखली तालुका अध्यक्ष संतोष परिहार यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्र सुरडकर, भगवान बाप्पू, अनंथा गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, रामेश्वर इंगळे, रमेश अवचार, मापारी ठेकेदार, ग्रामसेवक वीरसाहेब, उपसरपंच रामदास मुजमुले, पत्रकार राजेंद्र घुबे, प्रा. अमोल घुबे, विजय जावळे, प्रल्हाद इंगळे, गजानन पाटीलबा इंगळे, दत्तू गावडे, ग्रामसेवक सोळंकी, दामुअण्णा शिंदे, दत्तात्रय रुपसिंग परिहार, सतीश सोनुने, पांडुरंग भवर यांच्यासह विविध गावांतील सुवासिनी माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share This Article
Exit mobile version